Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या 'टू द पॉईंट'मधील मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. महायुतीत सामील होण्यापूर्वी शरद पवारांना हटवलं. तसंच शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवल्याचं लपवून ठेवलं असाही दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष फोडला नाहीतर ओरबाडला अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पक्ष सोडून जाणा-या प्रत्येकानं खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी मांडली.
"मी याआधी कोणालाच हे सांगितलेलं नाही. पण 2 जुलै रोजी सर्वांनी शपथ घेतली. पण 30 जून रोजी जो माझा वाढदिवस आहे, त्यांनी मला गिफ्ट दिलं. 30 जूनला शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नाहीत आणि त्यांना त्या पदावरुन काढण्यात आलं आहे हा निर्णय या सर्वांनी घेतला. त्यांनी बैठक घेतली का? जर पदावरुन काढलेलं असतं तर 1 जुलै रोजी एका तरी वृत्तपत्रात ही बातमी आली असती. किमान आम्ही शरद पवारांना अध्यक्ष पदावरुन काढून टाकल्याचं ट्विट तरी केलं असतं. कोर्टात तो कागद आला. पण त्या बैठकीचा पुरावा ना माझ्याकडे आहे, ना कोर्टाकडे आहे. शरद पवारांना 30 जून रोजी कोणत्या आधारे शरद पवारांना अध्यक्ष पदावरुन काढलं? काहीतरी प्रक्रियेचं पालन झालं असेल ना," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत,
पुढे त्या म्हणाल्या की, "जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा तेच लोक आम्ही तुम्हाला सोडू देणार नाही असं सांगत होते. मग एक-दीड महिन्यात असं काय घडलं की ज्या शरद पवारांना आग्रह करुन तुम्ही बसा म्हणला होतात त्याच पदावरुन काढून टाकलं".
"मला याबद्दल काही माहिती नव्हतं. जर मला कळलं असतं तर देशालाही कळलं असतं की शरद पवारांना त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षपदावरुन काढलं. हे ऑन रेकॉर्ड कोर्टात पेपर आहे. मिनिट्समध्ये नावं नसून, अजित पवारांची सही आहे. सहीप्रमाणे अजित पवारांनी शरद पवारांना 30 जूनला अध्यक्षपदावरुन काढलं आणि 2 जुलैला त्यांनी शपथ घेतली. यानंतर 3 जुलैला पत्रकार परिषदेत त्यांना तुमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? असं विचारलं असता शरद पवार उत्तर दिलं हेदेखील रेकॉर्डवर आहे," असंही त्यांनी सांगितलं.