Mahavikas Aaghadi Formula: विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप, मनसेने उमेदवार जाहीर केले. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देखील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान महाविकास आघाडीचा निवडणुकीचा फॉर्म्युला कसा असणार? याचे उत्तर मात्र अद्याप मिळाले नव्हते. मागच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप अगदी सुरळीत पार पडलं आहे. तिन्ही पक्ष 85-85-85 या जागांवर सहमती दर्शवली आहे. उरलेल्या पक्षांवर मित्र पक्षांशी बोलून त्यांची सहमती घेतली जाईल. अशा 288 जागांवर महाविकास आघाडी लढेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, संजय राऊत यांच्यात वायबी सेंटर येथे बैठक झाली. यानंतर महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा सुटल्याचे सांगण्यात आले आहे.
महाविकास आघाडीसोबत शेकाप, माकप आप आणि सपा या मित्रपक्षांना अठरा जागा देणार असल्याचं मविआच्या नेत्यांनी जाहीर केलंय.जागावाटपाची आकडेवारी सांगताना मविआचे नेते वेगवेगळे आकडे सांगताना दिसत होते. त्यामुळं जाहीर केलेल्या समसमान फॉर्म्युल्यावरुनही वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
85 + 85 + 85 एकूण 255 होतात. मात्र संजय राऊत आणि नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर 85 + 85 + 85अशा एकूण 270 जागांचे जागावाटप झाल्याचे गणित सांगितले.तसेच २७० जागांनुसार उर्वरित 18 जागा इतर पक्षांना असल्याचे देखील नमूद केले.मग 85 + 85 + 85 आणि इतर पक्षांच्या 18 जागा अशा जर पकडल्या तर एकूण 273 जागा होतात.मग उर्वरित 15 जागांचे काय?? या 15 जागांवर तिढा कायम तर नाही ना? अशा शंकांना उधाण आले आहे.