'...म्हणून मराठ्यांनी महायुतीला मतदान केलं'; मुख्यमंत्रिपदावरुन मराठा समाजाची भूमिका

Maharashtra Assembly Election 2024 Maratha Community: एकनाथ शिंदेंनी बुधवारी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यंमंत्रिपदावरील दावा सोडत असल्याचं सूचित केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 28, 2024, 08:51 AM IST
'...म्हणून मराठ्यांनी महायुतीला मतदान केलं'; मुख्यमंत्रिपदावरुन मराठा समाजाची भूमिका title=
मराठा समाजाने जाहीर केली भूमिका (फाइल फोटो)

Maharashtra Assembly Election 2024 Maratha Community: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी बुधवारी ठाण्यातील घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पदावरील दावा सोडला आहे. दिल्लीतील नेते ठरवतील तो मुख्यमंत्री मान्य असेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. असं असतानाच आता मराठा क्रांती ठोक मोर्चानेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावे अशी भूमिका घेतली आहे. 

शिंदेंचा मोदी-शाहांना फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी ठाण्यातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी बोलणं झाल्याचं सांगितलं. "मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे.  तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल," असं सांगितल्याची माहिती शिंदेंनी पत्रकारांना दिली. 

मराठा समाजाची भूमिका काय?

महाराष्ट्रात सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी मांडली आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून महायुतीला मतदान केलं. महायुतीचा राज्यभरात दणदणीत विजय झाला. आता महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टीचा समतोल ठेवायचा असेल तर शिंदे यांनीच मुख्यमंत्री असायला हवं अशी भूमिका मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक नागणे यांनी मांडली आहे.

नक्की वाचा >> 'मोदी, शहांवर विश्वास ठेवून...', 'माझे बाबा' उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, 'सत्ता आणि पद अनेकदा...'

आज तिन्ही मुख्य नेते दिल्लीत

दिल्लीत आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेसहा वाजताच दिल्लीसाठी रवाना झालेत. सत्ता स्थापनेच्या पार्श्वूमीवर दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडणार आहे. आज दुपारच्या सुमारास एकनाथ शिंदेंही दिल्ला रवाना होणार आहेत. ते भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेण्याबरोबर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या बैठकीनंतर शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांशी दिल्लीत भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व खासदार आज दिल्लीत आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये नवी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे.