Maharashtra Assembly Election 2024 Mahavikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांनी प्रत्येकी किमान एक उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मात्र जागावाटपासंदर्भातील संपूर्ण निर्णय झाला नसल्याने काही जागांवरील उमेदवार कोणत्याही पक्षाने जाहीर केलेले नाहीत. सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमधील बिघाडीचं कारण राज्यातील 12 जागा ठरत आहेत. या 12 जागा नेमक्या कोणत्या आणि महाविकास आघाडीमध्ये या जागांवरुन गोंधळ का सुरु आहे हे जाणून घेऊयात...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या 65 उमेदवारांच्या पहिल्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्ष शेतकरी कामगार पक्षाने दावा केलेल्या 12 जागांवर उमेदवार जाहीर केली. निफाड, गेवराई, लोहा, भूम परांडा, सांगोला, रामटेक, अकोला पूर्व, वणी, सोलापूर दक्षिण, पाटण, ऐरोली आणि नाशिक मध्य अशा 12 मतदारसंघांमध्ये ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. या मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या पक्षाने या ठिकाणी उमेदवार जाहीर केल्याने गोंधळ उडाला. आघाडीत तेढ निर्माण होण्यास हेच 12 मतदारसंघ कारणीभूत ठरत असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरेंनी इतर मित्रपक्षांबरोबर चर्चा न करता या 12 जागांवर थेट उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा वेग मंदावल्याचं सांगितलं जात आहे.
एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघात शेकापचे बाबासाहेब देशमुख इच्छुक होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापला ही जागा देशमुख यांच्यासाठी हवी होती. शिवसेना ठाकरे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून आयात केलेल्या दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली. शेकापवर अशा प्रकारची कुरघोडी लोहा मतदारसंघातही करण्यात आली. या मतदारसंघात सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे शेकापच्या तिकिटावर विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही ते शेकापकडून लढण्यास इच्छुक होते. त्यांच्या या इच्छेचा विचार न करता त्यांच्या जागी 2014 मध्ये भोसरी मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढलेल्या एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
ठाकरेंच्या पक्षाने या मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राजेंद्र मुळक यांना डावलून थेट विशाल बरबटे यांची उमेदवारी जाहीर केली. अकोला पूर्व मतदारसंघात गोपाल दातकर यांना उमेदवारी जाहीर झाली. या ठिकाणी पूजा काळे व कपिल ढोके या काँग्रेसच्या उमेदवारांनी दावा केला होता. वणी मतदारसंघात संजय दरेकर या नवख्या उमेदवाराला ठाकरेंनी निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली. या ठिकाणी काँग्रेसचे वामनराव कासावर हे गेली अनेक वर्ष इच्छुक उमेदवार असताना ठाकरेंनी थेट उमेदवारी जाहीर केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
माजी आमदार राहिलेल्या दिलीप बनकर यांच्या निफाड मतदारसंघात ठाकरेंकडून अनिल कदम यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. बनकर हे दोन्ही राष्ट्रवादीमधून उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवून होते. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने ते शरद पवार गटाकडून प्रयत्नशील होते. गेवराई मतदारसंघात बदामराव पंडित यांचे नाव जाहीर झाले आहे. भूम परांडा मतदारसंघाच्या बदल्यात हा मतदारसंघ ठाकरे लढवणार होते. मात्र राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता ठाकरेंच्या पक्षाने गेवराईबरोबरच भूम-परांडा या दोन्ही मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. भूम-परांडा येथून राहुल पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे.
नक्की वाचा >> 'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'
सोलापूर दक्षिण मतदारसंघातून अमर पाटील उमेदवार आहेत. काँग्रेसचे दिलीप माने या मतदारसंघात गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. पाटण मतदारसंघ म्हणजे पक्षांची लढाई नसून देसाई – पाटणकर कुटुंबाची लढाई मानली जाते. शिवसेना फुटीनंतर शिवसेना शिंदे पक्षाचे नेते झालेल्या शंभूराजे देसाई यांना हरविणे हे ठाकरेंचे लक्ष्य आहे. या मतदारसंघातील सत्यजीत पाटणकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडून लढण्यास तयार होते. ते मशाल हाती घेण्यास तयार नसल्याचे समजते.