'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'

Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 25, 2024, 07:17 AM IST
'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...' title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला टोला

Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिली उमेदवारी यादी समोर आल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती होणार असल्याचं निश्चित झालं आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ! या मतदारसंघामधून आदित्य 2019 साली पहिल्यांदा आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आले. त्यावेळेस आदित्य यांचे चुलते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र यंदा चित्र वेगळं आहे. मनसेनं आदित्य ठाकरेंविरोधात राज यांचे विश्वासू सहकारी आणि मनसेचे नेते संदीप देशपांडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून मनसे पूर्ण जोर लावत असल्याचं चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा गुरुवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनीच केला. वरळीमध्ये मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते गुरुवारी पार पडलं. संदीप देशपांडेही यावेळेस उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी थेट आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.

मनसे घराघरात जाऊन...

राज ठाकरेंच्या हस्ते लाल फित कापून राज ठाकरेंनी मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राज ठाकरेंनी या कार्यालयाची पहाणी करुन काही सल्ले संदीप देशपांडेंना दिले. राज ठाकरेंच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया नोंदवताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. "निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. मनसेने प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. आज राज ठाकरे यांनी वरळीमध्ये मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. मनसे घराघरात जाऊन कामाचे मुद्दे पोहोचवत आहे," असं म्हणत संदीप देशपांडेंनी प्रचारासंदर्भातील माहिती दिली.

आदित्य ठाकरेंना लगावला टोला

विरोधकांनी म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेनं वरळीमध्ये मनसेचं आव्हान आपल्याला वाटत नाही असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संदीप यांनी ठाकरेंच्या सेनेला टोला लगावला. "त्यांना कुठल्याच गोष्टीचं आव्हान वाटत नाही. 20 तारखेला त्यांना जनतेचे आव्हान कळेल. शेवटी आव्हान प्रतिस्पर्ध्याचे नसते. तुम्ही जनतेची कामं केली आहेत की नाही हा महत्त्वाचा विषय आहे. जनतेची कामं केली नसतील तर मग काय? जो काम करतो तो काम दाखवतो. काही पत्र्याचे शेड बांधण्याला काम म्हणत असाल तर आमच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा," असा टोला संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख न करता लगावला.

नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'

सुशांत शेलारबद्दलही नोंदवलं मत

प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात संदीप देशपांडेंना विचारलं असता त्यांनी, "त्या पक्षांना विचारा त्यांचा उमेदवार ते ठरवणार. यावर मी काय बोलणार? निवडणूक म्हटली की ती लढवायची असते आणि आम्ही ती पूर्ण ताकतीने लढवत आहोत. शेवट ही लोकशाही आहे कुणीतरी निवडणूक लढवणारच सुशांत असो किंवा आदित्य असो," असं उत्तर दिलं.