Maharashtra Assembly Election 2024: छगन भुजबळांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. समीर भुजबळ कालही आणि आजही आमच्यासोबतच आहेत, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. छगन भुजबळांची ही दोन्ही वक्तव्यं सध्या प्रचंड चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजीनामा देत समीर भुजबळांनी नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवली. शिवसेनेच्या सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ या लढतीत कांदेंनी बाजी मारली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. आता पराभवानंतर छगन भुजबळांच्या सोबत समीर भुजबळ पाहायला मिळाले. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारताच भुजबळांनी आपल्या स्टाईलनं उत्तर दिलंय.
राजकारणात अनेक काका-पुतण्यांमध्ये राजकीय वैर पाहायला मिळालं. बाळासाहेब ठाकरेंची पुतणे राज ठाकरेंनी साथ सोडली. शरद पवारांशी पुतणे अजित पवारांनी कोडीमोड घेतला. अजित पवारांविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र यांनी दंड थोपटले होते. गोपीनाथ मुंडेंपासून धनंजय मुडे वेगळे झाले होते. जयदत्त क्षीरसागर यांच्याशी संदीप क्षीरसागर यांचं वैर सर्वश्रूत आहे
भुजबळांनाही ऐन मोक्याच्या वेळी त्यांच्या पुतण्यानं धोका दिला होता. इतरांचा अनुभव पाहिल्यावर त्यांचा पुतण्याही तसाच निघाला अशी भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. नांदगावमधून लढण्यासाठी समीर भुजबळांनी घड्याळाची साथ सोडून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता निकालानंतर लगेच समीर भुजबळ हे छगन भुजबळांसोबत दिसताहेत. छगन भुजबळांच्या सांगण्यावरूनच सारं काही घडवलं गेलं का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यावर आता काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.