Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी मतदान झाले असून आता प्रतिक्षा आहे ती निकालाची. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात सत्तापालटही होऊ शकतो किंवा महायुती पुन्हा सरकार स्थापन करु शकते असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक पार पडली. रेकॉर्डब्रेक मतदान झाल्यानंतर आता सत्ता कुणाची येणार याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसून येतंय
निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झालीय. काँग्रेसच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार येईल,असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. पटोलेंचं वक्तव्य राऊत यांना खटकले असून नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी असं राऊतांनी म्हटलंय.
महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली असतानाच महाविकास आघाडीप्रमाणंच महायुतीमध्येही मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झालीय.. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील,असा दावा संजय शिरसाट यांनी दावा केलाय.
मात्र,शिरसाट यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी असहमती दर्शवलीय. मुख्यमंत्रिपदावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता तिसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्रिपदावरून मोठं वक्तव्य केलंय. मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचं पारडं जड दिसतंय. दहा पैकी सहा एक्झिट पोलनं महायुतीची पुन्हा सत्ता येईल असा अंदाज वर्तवलाय. तर तीन एक्झिट पोलनी महाविकास आघाडीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवलाय. तर एका एक्झिट पोलनं त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवलाय. शनिवारी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कुणाला बहुमत मिळणार हे स्पष्ट होणार असल्यानं त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.