एका महिलेच्या शापामुळे महाविकास आघाडी सरकार पडले, आता ते कधीही येणार नाही -करुणा मुंडे

Karuna Munde : माझे पती हे सरकार देव आला तरी पडू शकत नाही असं म्हणायचे, असेही करुणा मुंडे म्हणाल्या

Updated: Nov 19, 2022, 01:29 PM IST
एका महिलेच्या शापामुळे महाविकास आघाडी सरकार पडले, आता ते कधीही येणार नाही -करुणा मुंडे title=

Karuna Munde On MHA Government : माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्यावर पत्नी करुणा मुंडे (karuna munde) या सातत्याने चर्चेत असतात. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेकदा आरोप केलेत. काही महिन्यांपूर्वी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपांनंतर राज्यातील राजकारण बरंच तापलेलं होतं. यानंतर करुणा मुंडे यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापन केली. राज्यातील राजकीय घडामोडींवरही करुणा मुंडे नेहमीच व्यक्त होत असतात. राज्यातील सत्तातरांबाबत बोलताना करुणा मुंडे यांनी आपल्या शापामुळे हे सरकार पडलं असे म्हटले आहे.

पुण्यात (Pune) एका पत्रकार परिषदेत बोलताना करुणा मुंडे यांनी हे विधान केले आहे. करुणा मुंडे यांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबाबत बोलताना करुणा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर (maha vikas aghadi) टीका केली. "चुकीची कारवाई अनेकांवर झाली. माझ्या गाडीमध्ये तर पिस्तूल ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी कोणत्याही महिला नेत्यांनी याबाबत भाष्य केले नाही. आता आणखी लोकांवर कारवाई होणार आहे. 165 आमदारांचे सरकार पहिल्यांदा पडले. माझे पती (धनंजय मुंडे) हे सरकार देव आला तरी पडू शकत नाही असं म्हणायचे. ( धनंजय मुंडे ) पण एका महिलेच्या शापाने महाविकास आघाडी सरकार पडले. आता जे सरकार यायचं स्वप्न पाहात आहेत ते आता कधीही येणार नाही," असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

कोण आहेत करुणा मुंडे?

करुणा मुंडे या मूळच्या मध्य प्रदेशमधील इंदौरच्या आहेत. पण काही वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहेत. करुणा मुंडे यांच्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती दिली होती. "करुणा शर्मा यांच्यासोबत माझे 2003 सालापासून परस्पर सहमतीने संबंध आहेत," असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते.