LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पक्षाचं 'मशाल गीत' लाँच केलं आहे. मुंबईत शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी संजय राऊतही उपस्थित होते. दरम्यान सांगलीच्या जागेवरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना उद्धव ठाकरेंनी, गद्दारी होत असेल तर त्या संबंधित पक्षाने लक्ष घातलं पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच बंडखोरी झाल्यास जनता माफ करणार नाही असा इशाराही दिला आहे.
"मशालीचं तेज आणि आग लोकसभा निवडणुकीत दिसेल. मशालगीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. चिन्ह नवीन आहे, पण मशाल महाराष्ट्राला नवीन नाही. ही मशाल अधिक प्रकाशमान आणि तेजस्वी होईल असंही यावेळी ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, "शिवसेनेचं नवीन गीत महाराष्ट्रातील जनतेसमोर सादर केलं आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत या चिन्हाने विजयाची सुरुवात झाली आहे. मशाल सरराकविरोधात असंतोष भडकणारी आहे. हुकूमशाही राजवट जाळून भस्म होईल असा आम्हाला विश्वास आहे". ईव्हीमएवर असणारं मशालीचं चित्रही यावेळी उद्धव ठाकरेंनी दाखवलं. हे चिन्ह प्रचार करताना वापरावं असं आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि मित्रपक्षांना केलं.
हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत प्रचार गीत. pic.twitter.com/my47lPlvsC
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) April 16, 2024
उद्धव ठाकरेंनी यावेळी महाविकास आघाडी लवकरच एकत्रिपतपणे जाहीरनामा प्रसिद्ध करेल अशी माहिती त्यांनी दिली. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असून त्यांनी सर्वसमावेशक जाहीरनामा सादर केला आहे. पण आम्ही मित्रपक्ष चर्चा करत आहोत. त्यात राज्याच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न, मुद्दे मांडणार आहोत. यानंतर संयुक्तपणे जाहीरनामा प्रसिद्ध करु असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपाचं बिंग फुटलं. सुप्रीम कोर्टामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. जर सुप्रीम कोर्टाने बिंग फोडलं नसतं तर हजारो कोटी कुठून मिळाले कळलं नसतं. विरोधी पक्षाला हे आधी का झालं नाही याचा पश्चाताप नक्की होईल," असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा अमित शाह, नरेंद्र मोदी आले नव्हते. आता त्यांनाही जनतेला काय म्हणायचं हे त्याना समजेल. आधी केलं असतं तर ही वेळ आली नसती असंही ते म्हणाले. संपूर्ण देशात हुकूमशाहीविरोधात जनमत तायर झालं आहे. ते फक्त मतदानाची वाट पाहत आहेत असंही त्यांनी सांगितलं.
सांगलीच्या जागेवरुन सुरु असलेल्या वादाबाबत विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "अंतिम जागावाटप झालं आहे. अधिकृत पत्रकार परिषद घेत जागावाटप जाहीर झालं आहे. जर त्यानंतरही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबादारी आहे. जर कुठे बंडखोरी होत असेल तर जनता त्यांना माफ करणार नाही".