'मी मतं मागणार नाही' म्हणत प्रचार करणाऱ्या गडकरींना नाना पटोलेंचा टोला, म्हणाले 'डमी उमेदवार...'

LokSabha: मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका असं विधान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात केलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Apr 7, 2024, 11:18 AM IST
'मी मतं मागणार नाही' म्हणत प्रचार करणाऱ्या गडकरींना नाना पटोलेंचा टोला, म्हणाले 'डमी उमेदवार...' title=

LokSabha Election: मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका असं विधान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. मात्र सध्या नितीन गडकरी प्रचारात व्यग्र दिसत आहेत. नुकतंत नागपुरात त्यांच्या एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावरुन काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी टोला लगावला आहे. दरम्यान नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याने काँग्रेसने (Congress) आधीच तक्रार दाखल केली आहे. 

लोकसभा निवडणुकीआधी एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले होते की, “मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका”. 

यावर टीका करताना नाना पटोले म्हणाले आहेत की, "डमी तर भाजपाचे उमेदवार आहे. मी मतं मागणार नाही, लोकांच्या घरी जाणार नाही. मतं द्यायची असली तर देतील असं म्हणणारे आता कशाला मतं मागत आहेत. कोणत्याही उमेदवाला डमी म्हणत ते दिशाभूल करत आहे. भाजपाची विक्षिप्त मानसिकता लोकांना समजली आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जागा महाविकास आघाडी जिंकेल असं चित्र आहे". 

गडकरींच्या रॅलीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नितीन गडकरी यांच्या निवडणूक रॅलीत लहान मुलांचा वापर करण्यात आल्याने काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

1 एप्रिलला एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलचे विद्यार्थी दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केली होती. हा सरळसरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करावं. निवडणूक आयोगानेही याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

"एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नाही"

"एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नाही. भाजपात त्यांचा छळ झाला असून, याबद्दल ते अनेकदा बोलले आहेत. ते स्वाभिमानी नेते आहेत, त्यामुळे असा निर्णय घेतील असं वाटत नाही," असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या जावयाला जेलमध्ये टाकलं. त्यांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. असं असताना ते भाजपात जातील असं वाटत नसल्याचं माझं मत आहे असं ते म्हणाले. नरेंद्र मोदींसारखे विश्वगुरु असताना त्यांना इतर पक्षातील नेते कशाला हवे आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. निवडून येऊ शकत नसल्याने, आश्वासनं पूर्ण न केल्याने सर्व भ्रष्टाचारी लोकांना एकत्र केलं आहे. त्यांच्या माध्यमातून देशाची संपत्ती लुटण्याचं काम सुरु आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. 

नरेंद्र मोदी आपल्या भाषणात देशासाठी काहीच बोलत नाही. गांधी कुटुंब, नेहरु कुटुंब यावरच बोलत असून, 10 वर्षांपासून हेच सांगत आहेत. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही पण आपल्या मित्रांचं 16 कोटींचं कर्ज माफ केलं त्याबद्दल सांगितलं पाहिजे. दिशाभूल करण्याचं काम सुरु असून, जनतेलाही ते समजलं आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.