'आम्ही कधीच मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही फक्त..' काय म्हणाले गुलाबराव पाटील?

Gulabrao Patil: लोकसभेत आम्ही मित्र पक्षांची गद्दारी करणार नाही, असा शब्द शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलबराव पाटील यांनी दिला आहे.  

Updated: Apr 7, 2024, 10:54 AM IST
'आम्ही कधीच मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही फक्त..' काय म्हणाले गुलाबराव पाटील? title=
Gulabrao Patil

वाल्मिकी जोशी, झी २४ तास, जळगाव:लोकसभेत आम्ही मित्र पक्षांची गद्दारी करणार नाही, असा शब्द शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलबराव पाटील यांनी दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा पद्धतीने आम्ही कार्यकारिणीची रचना केली असून येथे 20 तारखेपर्यंत जिल्हा परिषदेत आम्ही मिळावे घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. संघटना बांधणी, लोकसभा निवडणूक, विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणूक असेल, या निवडणुकांसाठी आम्ही आजपासून तयारीला लागलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरदेखील भाष्य केले.एकनाथ खडसे चंद्रपूरमध्ये 9 एप्रिल रोजी भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.विदर्भातून ते आपल्या खानदेशात येतील. ते मूळ विचारधारांमध्ये येत आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. जिल्ह्यातही निश्चित आम्ही त्याचे स्वागत करु, असे गुलाबराव म्हणाले. सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नाही कहते. जळगावमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.मंत्री म्हणून ओळख होती.मात्र त्यांनी विचारधारा सोडल्यामुळे बऱ्याचवेळा त्यांच्यावर टीकासुद्धा केली. मात्र आता मागच्या काळात जे झालं ते आम्ही आता विसरून जाऊ आणि नव्याने अध्याय सुरू करू, असे पाटलांनी सांगितले. 

बबनराव घोलप हे शिवसेनेचे आहेत. धनुष्यबाणाकडे येताहेत, बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत आहेत, अशा शब्दामध्ये बबनराव घोलप यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 

नाशिकची जागा ही शिंदे गटाचीच आहे.कारण उत्तर महाराष्ट्रात जेवढे मतदारसंघ येतात त्या मतदारसंघापैकी नाशिकची जागाच फक्त शिवसेना लढतो.त्यामुळे नाशिकची जागाही शिंदे गटालाच मिळावी अशी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांची मागणी असल्याचा पुनरोच्चार शिंदे गटाच्या वतीने यावेळी करण्यात आला. 

लोकसभेत आम्ही मित्र पक्षांशी गद्दारी करणार नाही.आम्ही उद्धव साहेबांना सोडून जो उठाव केला तो समोर सांगून केला आणि जावून केला.त्यामुळे आम्ही जे करतो ते समोर करतो आणि बरोबर करतो मनासारखं करतो.आतापर्यंतचा इतिहास आहे की शिवसेनेने कधीही लोकसभा निवडणुकीत पाठीत खंजिर खूपसलेला नाही आणि खूपसणार नाही.फक्त विनंती एवढी आहे की, मागच्या निवडणुकीत जे झाले ते आता पुढे होऊ नये. आता पुढे असं होणार नाही याची खात्री बाळगून आम्ही आमचं काम करणार आहोत. त्यामुळे आम्ही महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार अशी भूमिका या गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केली. 

मागच्या वेळी लोकसभेत काम करूनही विधानसभेत बंडखोऱ्या झाल्या होत्या. त्या होऊ नये म्हणून वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटातील प्रवेशाबद्दल विचारण्यात आले.माणूस गेला की पक्ष जातो अस होत नाही..काही प्रमाणात पक्ष संघटना खिळखिळा होते..मात्र पक्ष उभा होत राहतो.1990 पासून हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे आणि यापुढे सुद्धा राहील.