Loksabha Election 2024 Sambhaji Nagar UBT Candidate: लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन 3 दिवस उलटल्यानंतरही राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मायुतीमधील भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जागावाटपावर अद्याप एकमत झालेलं नाही. अशीच स्थिती महाविकास आघाडीची असून उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे भाजपाची पहिली 20 उमेदवारांची यादी वगळता एकही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. जागावाटपाबरोबरच यामागील अन्य एक मुख्य कारण म्हणजे तिकीटांवरुन पक्षांमध्ये सुरु असलेले अंतर्गत कलह आणि नाराजी नाट्य. असेच एक नाराजी नाट्य सध्या उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असल्याचं पाहयला मिळत आहे. याच नाराजी नाट्यावर तोडगा काढण्यासाठी आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंनी बंद दाराआड विशेष बैठक घेतली. यामध्ये उद्धव ठाकरेंबरोबर केवळ 2 व्यक्ती उपस्थित होत्या. या व्यक्ती म्हणजे चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे.
उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या संभाजीनगरमधून नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी यावरुन सध्या उद्धव ठाकरे गटाने संभ्रम आहे. एकीकडे चंद्राकांत खैरे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. तर दुसरीकडे अंबादास दानवेही तिकीटासाठी प्रयत्नशील आहे. हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे गटाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्याने कोणालाही दुखावून चालणार नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे. या विषयावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी आज उद्धव ठाकरेंनी खैरे आणि दानवे यांची बंद दाराआड भेट घेतली. तिन्ही नेत्यांनी एक ते सव्वा तास चर्चा केली. या बैठकीनंतर खैरे आणि उद्धव ठाकरे एकत्रच हॉटेलबाहेर पडताना दिसले. त्यामुळे या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला की अन्य काही निर्णय झाला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खैरेंनी आमच्यात वाद नव्हताच असं म्हटलं आहे. "संभाजीनगर शिवसेनाप्रमुख माननिय बाळासाहेब ठाकरेंचा हा बालेकिल्ला आहे. आज उद्धव ठाकरेंचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे. त्यामुळे या ठिकाणी 100 टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय होईल,ठ असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला. त्यानंतर एका पत्रकाराने, 'सर तुमच्यात असलेला वाद संपला का?' असा प्रश्न खैरेंना विचारला. त्यावर खैरेंनी, 'केव्हाच. काही वाद नाहीच आमच्यात . उगाच तुम्हीच काहीतरी दाखवता,' असं म्हटलं.
यापूर्वीही अंबादास दानवे हे तिकीट न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा होती. अगदी ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु होती. मात्र नंतर दानवे यांनीच या वृत्ताचं खंडन केलं होतं. तरीही आज झालेल्या बैठकीनंतर या जागेवरुन ठाकरे गटामध्येच अंतर्गत धुसपूस सुरु असल्याचं सूचित झालं आहे.