How To Start Silk Farming: अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. राज्यात डिसेंबर व मार्च महिन्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. फळबागांचे नुकसान झाले. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या या लहरी कारभारामुळं काही शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेतीसोबतच आधुनिक शेतीचा पर्यायही निवडला आहे. आधुनिक शेतीमुळं नफादेखील वाढला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना हा अनुभव आला आहे. वाशिमच्या भटउमरा गावातील अल्पभूधारक शेतकरी महादेव काळे हे देखील गेल्या 7 वर्षांपासून ही शेती यशस्वी करुन दाखवत आहेत.
वाशिमच्या भटउमरा गावातील अल्पभूधारक शेतकरी महादेव काळे हे मागील 7 वर्षांपासून रेशीम शेतीतून यशस्वी उत्पादन घेत आहेत. अत्यल्प खर्च असलेल्या या शेती पूरक उद्योगातून त्यांना इतर पिकांच्या तुलनेत चांगलाच नफा मिळत आहेत. सात वर्षांपूर्वी काळे यांनी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून 1 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली होती. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी असल्याने त्यांनी त्यातील काही क्षेत्र कमी केलं आहे.
महादेव काळे हे वर्षभरात रेशीम आळ्यांच्या तीन बॅच घेतात. प्रत्येक बॅचला फक्त तीन ते साडेतीन हजार इतकाच खर्च येतो. मात्र कोष निर्मिती झाल्यावर त्याची विक्री करुन त्यांना एका बॅचमधून 30 ते 35 हजार रुपयांपर्यंतचा नफा होतो. अवघ्या अर्ध्या ते पाऊण एकरात ते वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना येते. काळे यांच्याकडे आता फक्त तीन एकर शेती आहे. पण इतर पिकांच्या तुलनेत त्यांना चांगला नफा मिळत आहे.
मी रेशीम उद्योगची सात वर्षांच्या आधी सुरुवात केली. एका वर्षाला तीन बॅच इतके घेतो. या वर्षात मी दोन बॅच घेतल्या आहेत. तर एक बॅच आता सुरू आहे. या दोन बॅचमधून मला 70 ते 75 हजारांचा नफा मिळाला आहे. तर, या बॅचचेदेखील 30-35 हजार मिळतील अशी मला खात्री आहे. एका 150 अंडीपुंजांच्या बॅचमधून सरासरी 130 ते 140 किलो कोषांचे उत्पादन मिळते. जालना, बीड, पूर्णा, अमरावती या बाजारपेठेत याची विक्री केली जाते, अशी माहिती शेतकरी महादेव काळे यांनी दिली आहे.
रेशीम कोष उत्पादनासाठी तुतीचा उत्तम प्रतीचा पाला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक बॅच सुरू करताना दर्जेदार तुती पाला असणे गरजेचे आहे. तसंच, कोष काढणी सुरू झाल्यानंतर त्वरित तुती बागेची छाटणी केली पाहिजे. छाटणी केल्यानंतर साधारण दीड महिन्याच्या कालावधीत पाने किटकांना खाद्य म्हणून देण्यासाठी तयार होतात.
रेशीम उत्पादन हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय याप्रमाणे हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. शेतीविषय बारकाई समजून घेण्यास शासनाकडूनही मदत दिली जाते.