Weather Update In Maharashtra: मान्सून भारतात दाखल झाला आहे. येत्या काही दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. तर, काहीच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. मंगळवारी संपूर्ण देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला होणार आहे. त्याचवेळी पुण्यात वरुणराजा बरसणार आहे. पूर्व मोसमीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारनंतर ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वारे हळूहळू स्थिरावत आहेत. मान्सूनपूर्व पावसाची स्थिती आहे. विजाच्या कडकडाटासह राज्याच्या काही भागात 3 जूनपासून पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढणार आहे. पुण्यात 4-6जून पर्यंत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.
मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याच्या आधीच म्हणजे तीन दिवस आधीच ४ जूनला नैऋत्य मोसमी वारे तळकोकणात दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी 1 जून रोजी दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला तर खरीप हंगामाच्या पेरणीला काही दिवसात सुरुवात होणार असल्याने या पावसाने पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
मावळ तालुक्यातील शेती ही धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 30 दिवस पुरेल इतकेच पाणीसाठा शिल्लक आहे. तर तालुक्यातील इतर धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. जर यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह पिंपरी चिंचवड करांवर पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.