Loksabha Election 2024 : शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) मागील काही दिवसांपासून कैक कारणांनी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहेत. शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांना आणि त्याहूनही (ajit Pawar, Supriya Sule) अजित पवार, सुप्रिया सुळे यांना आव्हान देत बारामतीत कटू संघर्षाचे सूतोवाच केले होते. 'लढणार आणि जिंकणार' अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली होती. पण, आता हेच शिवतारे या संघर्षातून माघार घेण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
शिवतारे आणि पवार हा वाढता संघर्ष पाहता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी खुद्द मुख्यमंत्री (Eknath shinde) एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत शिवतारेंची एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून विजय शिवतारे यांच्या तक्रारींचं समाधान करण्यात यश आल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीमध्ये पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांबाबत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीनंतर गुरुवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवतारे सविस्तरपणे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून लढण्याची घोषणा शिवतारेंनी केली होती. मात्र शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी शिवतारेंसोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली ज्यानंतर शिवतारेंची समजूत घालण्यात त्यांना यश मिळालं. त्यामुळे अजित पवारांविरोधात शिवतारेंनी पुकारलेलं बंड आता थंड झाल्याचं स्पष्ट झालं आहे.