राज ठाकरेंमुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा? CM शिंदेनी केला खुलासा, म्हणाले 'अनेक...'

Eknath Shinde on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दरम्यान आज राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक पार पडली. या बैठकीत काय झालं याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.  

शिवराज यादव | Updated: Mar 21, 2024, 06:14 PM IST
राज ठाकरेंमुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा? CM शिंदेनी केला खुलासा, म्हणाले 'अनेक...' title=

Eknath Shinde on Raj Thackeray: आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरेंचा मनसे पक्ष महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बैठक पार पडल्यानंतर राज ठाकरेंनी आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर आता राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याचं नक्की झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचीही माहिती आहे. 

दरम्यान राज ठाकरेंसह झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. "राज ठाकरेंशी चर्चा सुरु आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसंच पुढे ते म्हणाले आहेत की, "अनेक समविचारी पक्ष नरेंद्र मोदींचे विचार, सरकारचं काम यावर विश्वास ठेवून सोबत येत आहेत".

राज्यात 45 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या आल्या पाहिजेत यासाठी पक्षाची आढावा बैठक घेतली. मतदारसंघातील पदाधिका-यांची बैठक घेवून व्यूहरचना केली अशी माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याने त्यांनी संताप केला. नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह आहे असं ते म्हणाले आहेत. "हे दुर्देव आहे. देशभक्त आणि राष्ट्रभक्त असणाऱ्या मोदींनी देशाला नवा आयाम, उंची दिली. बाळासाहेबांचं राम मंदिर बांधण्याचं, जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा आदरणीय पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं देशाचा अपमान, देशद्रोह आहे. त्यांची निंदा करावी तेवढी कमी आहे. कारण त्यांनी औरंगजेबी वृत्ती त्यांनी दाखवली आहे. औरंगजेबाने भावांना, वडिलांनाही सोडलं नव्हतं. पण यांना महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत सूड घेईल", असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शेपूट घातली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वात 370 कलम हटवलं. त्यांनी स्वप्न खरं करुन दाखवलं. त्यांना शेपूट घालणं म्हणणं ही मर्दुमकी नाही. हे फोटोग्राफर असून त्यांना शेपूट असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत जाऊन लोटांगण घालणारे, नोटीस आल्यावर शेपूट घालणारे आहेत. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी यांनी सगळं सोडलं होतं".