Loksabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून (Ratnagiri-Sindhudurga Loksabha Constituency) शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे किरण सामंत (Kiran Samant) यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे काही नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात आहे, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही तर दुसरीकडे मविआकडून उमेदवार विनायक राऊत यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. विनायक राऊत यांच्यासमोर उमेदवार कोण याची चाचपणी सुरु झालीय. विजयाचा निर्धार मनामध्ये ठेवत अर्ज दाखल करत असल्याची प्रतिक्रिया विनाय राऊत यांनी दिलीय. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो राहणारच, नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभवाची हॅट्रिक करण्याची संधी आम्ही दुरावणार नाही असंही राऊत म्हणाले.
नाशिकच्या जागेवरुनही तिढा कायम
दुसरीकडे, नाशिक लोकसभा जागेचा तिढागी अद्याप सुटलेला नाही. नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. चैत्र नवरात्रीच्या देवीचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला अजय बोरस्ते ठाण्यात आले होते. नाशिकच्या जागेसाठी बोरस्ते यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी शिवसैनिकांची आहे. तर दुसरीकडे उमेदवारीसाठी हेमंत गोडसेंनीही अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटी गाठी घेतल्यात. मात्र आता अजय बोरस्ते यांचीही मध्यरात्री भेट झाल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री आणि बोरस्तेंमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना मागणी
दरम्यान, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सभाची मागणी वाढलीय. महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभा घेण्याची मागणी करण्यात येतेय. पूर्व विदर्भात आतापर्यत देवेंद्र फडणवीस यांच्या 20 पेक्षा जास्त सभा झाल्यात तर राज्यात 125 सभा यापुढे फडणवीस घेणार आहेत. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीसांकडून सभांचा धडाका लावला जातोय. प्रचार संपण्यापूर्वी 20 पेक्षा अधिक सभा पूर्व विदर्भात नियोजित आहेत. केंद्रात पंतप्रधान मोदी-शाहा-योगींच्या सभांची मागणी असताना राज्यात फडणवीसांच्या सभांची डिमांड सर्वाधिक आहे..
मिशन 45 साठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागलेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजप आमदारांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. महायुतीचा प्रत्येक खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येक आमदाराला विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य द्यावं लागणार आहे. तशा सूचनाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना दिल्यात. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ज्यांना पुन्हा आमदारकीचे तिकीट हवंय त्या सर्वांना आपल्या मतदारसंघातून लीड देणं बंधनकारक असणार आहे.. त्यामुळे एखाद्या उमेदवाराबाबत कितीही नाराजी असली तरी स्वतःला पुन्हा आमदारकीचं तिकीट मिळावे यासाठी तरी आमदारांना काम करावे लागणार आहे.