LokSabha Election: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपाने 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणा दिली आहे. तसंच महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपा संपूर्ण देशात 45 जागा जिंकेल असा टोला लगावला आहे. इतकंच नाही तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात 48 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पक्षाचं 'मशाल गीत' लाँच केलं आहे. मुंबईत शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडी 48 जागा जिंकणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांना भाजपाने 45 जागा जिंकणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, "हो ते 45 जागा जिंकतील. त्यांचा हा देशातील आकडा आहे".
कर्नाटकच्या मंत्र्यांनी संविधान बदलायचं असल्याने 400 पार कराचं असल्याचं सांगितलं आहे. त्यांचे डाव उघड पडत आहेत. आता हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशीच निवडणूक होणार आहे. हा देश धर्म म्हणून एकत्र आहे. सर्व देशभक्तांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आधी हुकूमशाही हटवा असं माझं सर्वांना आवाहन आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
"निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपाचं बिंग फुटलं. सुप्रीम कोर्टामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. जर सुप्रीम कोर्टाने बिंग फोडलं नसतं तर हजारो कोटी कुठून मिळाले कळलं नसतं. विरोधी पक्षाला हे आधी का झालं नाही याचा पश्चाताप नक्की होईल," असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा अमित शाह, नरेंद्र मोदी आले नव्हते. आता त्यांनाही जनतेला काय म्हणायचं हे त्याना समजेल. आधी केलं असतं तर ही वेळ आली नसती असंही ते म्हणाले. संपूर्ण देशात हुकूमशाहीविरोधात जनमत तायर झालं आहे. ते फक्त मतदानाची वाट पाहत आहेत असंही त्यांनी सांगितलं.
सांगलीच्या जागेवरुन सुरु असलेल्या वादाबाबत विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "अंतिम जागावाटप झालं आहे. अधिकृत पत्रकार परिषद घेत जागावाटप जाहीर झालं आहे. जर त्यानंतरही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबादारी आहे. जर कुठे बंडखोरी होत असेल तर जनता त्यांना माफ करणार नाही".