सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांनी नाशिक लोकसभेच्या जागेवरून (Nashik Loksabha Constituency) निवडणूक लढवली. नाशिकमध्ये 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. शांतिगिरी महाराज यांनी माघार घ्यावी यासाठी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. नाशिक लोकसभेसाठी महायुतीत मोठी रस्सीखेच होती. महायुतीकडून हेमंत गोडसे, छगन भुजबळ, शांतिगिरी महाराज, दिनकर पाटील इच्छुक होते. मात्र नाशिकच्या जागेसाठी शिवसेना (Shivsena) आग्रही होती. तर शांतिगिरी महाराज भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते. मात्र विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने ही जागा अखेर शिवसेनेला सुटली. पण शांतिगिरी महाराज हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपने केली मनधरणी
शांतिगिरी महाराज यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र त्यांना एकाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. अखेर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आता नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने शांतिगिरी महाराज यांची मनधरणी करण्याचा प्रयन्त केला. मात्र त्यांनी आता माघार नाही... आता लढायचं आणि जिंकायचं .... असं म्हणत प्रचाराला सुरवात केली.
नरेंद मोदी आणि शांतिगिरी भेट
15 मे रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांची नाशिकच्या पिंपळगाव इथं महायुतीच्या उमेदवारसाठी प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना भेटीचं आमंत्रण देण्यात आलं. मात्र वाहतुकीत अडकल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याच शांतिगिरी महाराज यांनी सांगितलं.
शांतिगिरी महाराज करणार मोदींचा प्रचार
पाचव्या टप्प्यात नाशिकची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच उमेदवार निवांत झाले असून 4 जूनच्या निकालाची वाट पाहातायत. शांतिगिरी महाराज सुद्धा त्यांच्या कामाला लागले आहेत. 28 मे ते 4 जूनदरम्यान वाराणसी इथं जर्नादन स्वामी आश्रमात जपानुष्ठानचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने शांतीगिरी महाराज रवाना होणार आहेत. मात्र, रवाना होण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपण प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदर्शवत आहेत, तसेच त्यांच्याशी आपले विचार जुळत असल्याने आपण त्यांचा प्रचार करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. मोदींचा प्रचार करणार म्हणजे भाजपाचा प्रचार करणार काय, याबाबत बोलताना 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले. यामुळे 4 जून नंतर शांतिगिरी महाराज भारतीय जनता पक्षाचा प्रचार करताना दिसले तर नवल वाटायला नको.