Loksabha 2024 : माढाचा तिढा दिवसागणिक सुटण्याऐवजी वाढतच चाललाय. माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना भाजपनं (BJP) उमेदवारी जाहीर केली आणि महायुतीतूनच विरोधाची ठिणगी पेटली. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel Mohite Patil) बंडाचं निशाण फडकावलं. एकतर अपक्ष किंवा राष्ट्रवादी शरद पवारांची (Sharad Pawar) तुतारी घेऊन, मात्र निवडणूक लढण्यावर ते ठाम असल्याचं समजतंय. खासदार निंबाळकरांच्या विरोधातील नेत्यांच्या भेटीगाठींचा सपाटाच त्यांनी लावलाय. त्याचाच भाग म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे भाऊ आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंतांची मोहितेंनी भेट घेतली.
देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई
माढ्यातला हा वाद सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई केली. विजयसिंह मोहिते पाटलांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला हजर असलेले रामराजे नाईक निंबाळकरांची समजूत काढण्याच प्रयत्न त्यांनी केला. मात्र जुनं वैर विसरून ते निंबाळकरांना साथ देणार की, बदला घेण्यासाठी मोहिते पाटलांच्या बंडाला हात देणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. निंबाळकरांनी गुरुवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावलीय. या बैठकीत पुढचा निर्णय घेतला जाणाराय.
हे कमी झालं म्हणून की काय, आता शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीलाही धार आलीय. खासदार निंबाळकर विश्वासात घेत नसल्याची तक्रार सोलापुरातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. महायुतीतली ही धुसफूस खासदार निंबाळकरांना निवडणुकीत महागात पडू शकते. महायुतीतल्या या नाराजीनाट्याची सूत्रं शरद पवार पडद्या आडून हलवत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळं माढाचा तिढा सोडवताना भाजपला मोठीच कसरत करावी लागणाराय.
माढात मविआचा उमेदवार कोण?
माढा लोकसभा संदर्भात भाजपमधील कुणीही आमच्या संपर्कात नाही. माढ्यातून लवकरच सक्षम उमेदवाराची घोषणा करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. कुणाशी आमचा सवांद नाही. जानकर आमचेच नेते आहे. मात्र राष्ट्रवादी स्वतंत्रपणे उमेदवारी घोषित करणार नाही. चर्चा करूनच योग्य उमेदवार घोषित केला जाईल असंही जयंत पाटलांनी म्हंटलंय.
अमरावतीतून नवनीत राणा?
दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी नवनीत राणांनाच मिळणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उमेदवारीचा निर्णय संसदीय समिती घेते. त्यामुळे तेच निर्णय घेतील मात्र नवनीत राणांनी गेल्या पाच वर्षात भाजपच्या समर्थनात काम करत असल्याचं सूचक वक्तव्यही फडणवीसांनी केलंय. राणांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसुळांचा तीव्र विरोध आहे.