Loksabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्राहर संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावरील सभेची परवानगी नाकारल्याने बच्चू कडू आक्रमक झालेयत. आज बच्चू कडूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. बच्चू कडूंच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेऊन स्टेडियमवर फिरवलं. त्यानंतर एका ओपन जीपमधून बच्चू कडूंची रॅली काढण्यात आली. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनिी खळबळजनक दावा केला आहे. अमरावतीत हिंदू-मुस्लीम दंगल घडू शकते, 26 तारखेपर्यंत निवडणुकीत काहीही होऊ शकतं, त्यामुळेच आम्ही एक पाऊल मागे घेतलं असा दावा बच्चू कडूंनी केलाय.
बच्चू कडू आक्रमक
अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावरील सभेची परवानगी नाकारल्याने बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर कडूंनी जोरदार प्रहार केलाय. मैदानाची परवानगी असतानाही सभेला मैदान नाकारलं. त्यामुळे रवी राणा हे भाजपचे संस्कार पायदळी तुडवत असून पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप केलाय. तर आम्ही रात्री सभास्थळी थांबलो असतो तर राणांनी मंडप पेटवला असताना असा आरोप कडूंनी केलाय.
रवी राणा यांचं प्रत्युत्तर
बच्चू कडू हे तोडीबाजीसाठी आणि सुपारीसाठी पब्लिसिटी स्टंट करतात असं प्रत्युत्तर रवी राणा यांनी दिलं आहे. तसंच कडूंना मातोश्रीवरुन फायनान्स होत असल्याचा आरोपही रवी राणा यांनी केला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी आम्ही सभागृह दिलं त्याचं आम्ही भांडवल केलं नाही, भांडवल करणं हा बच्चू कडूंचा धंदा झालाय, मंत्री असताना काय काम केलं शेतकऱ्यांसाठी कधी तुरुंगात गेले का? हा रवी राणा सहा वेळा तुरुंगात गेला असा हल्लाबोल रवी राणा यांनी केलाय.
बच्चू कडूने मला तुरुंगात टाकलं होतं, हा नौटंकीबाज केवळ पब्लिस्टी आणि तोडीसाठी आंदोलन करतो, पण बच्चू कडूने कितीही नौटंकी केली तरी यातून काहीही मिळणार नाही. कडू पोलिसांना अरेकारे करतो, मला धमकी देतो, जनता सगळे पाहत आहे. उमेश कोल्हे हत्याकांड देशभरात गाजलं. त्या जागी कधीही बच्चू कडू गेले नाहीत, तो व्यक्ती कधीही बाप बढाना भैया सबसे बडा रुपया या सिद्धांतावर चालतो असा आरोपही रवी राणा यांनी केलाय.परतवाडा चांदूरबाजार रोडवर 100 एकर मध्ये बच्चू कडूचा फार्म हाऊस आहे. दाल मिलच्या नावावर केंद्राकडून सबसिडी घेऊन दालमिली बंद झाली आणि सबसिडी खाऊन बसला असा गौप्यस्फोटही रवी राणा यांनी केलाय.
तर अमरावतीत बच्चू कडूंची नौटंकी सुरूये, असा आरोप भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. त्यांना पराभव दिसतोय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय...त्यामुळे ते जनतेत दहशत निर्माण करतायेत, असा आरोपही प्रसाद लाड यांनी केलाय.
अमित शाहंची सभा
दरम्यान, सायन्सकोर मैदानावर अमित शहा यांच्या सभेची तयारी पूर्ण झालीय. अमरावती भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी सायन्सकोर मैदानावर आज अमित शहा यांची ही सभा होतेय. काल बच्चू कडूंनी याच मैदानावर सभा घेणार असल्याचा दावा केला होता. यावरून सायन्सकोर मैदाना परिसरामध्ये राडाही झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना सुरक्षेच्या कारणावरून या मैदानावर सभेसाठी परवानगी नाकारली होती. वादाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नवनीत राणा यांच्यासाठी अमित शहा यांचीही प्रचार सभा होत आहे. महत्त्वाचं म्हणजे काल पावसामुळे सभा मंडपाचा काही भाग कोसळला होता. मात्र आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेची पूर्ण तयारी झाली आहे