मुंबई : लोकसभा 2019 ची निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागा वाटप झाले असले तरी स्थानिक पातळीवरील राजकारण, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते यामुळे काही जागा युतीसाठी आव्हानात्मक राहणार आहेत. निवडणुकीच्या आधी शिवसेना भाजपाची निती आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर सातत्याने टीका करत होती. राज्यात आम्ही मोठे भाऊ आहोत ही सेनेची सुरूवाती पासुनची भूमिका राहीली आहे. राज्यातील तीन जागांवर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमधून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. अमरावती, यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूरमध्ये शिवसेना आणि भाजपा एकमेकांसाठीच अडचणी तयार करत असल्याचे वातावरण आहे.
चंद्रपूरमध्ये केंद्रीय मंत्री हंसराज आहीर खासदार आहेत. ते चार वेळा या ठिकाणाहून निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर असणार आहेत. ते शिवसेनेचे आमदार होते आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये सामील झाले. दुसरीकडे याच लोकसभा जागे अंतर्गत येणाऱ्या विधानसभा जागेवर आमदार आणि राज्य सरकारचे मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील येतात. मुनगंटीवार आणि आहीर यांच्यातही दुरावा असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. अशावेळी जागा जिंकण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेला अंतर्गत लढाई संपवावी लागणार आहे.
यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेत अंतर्गत लढाई आहे. इथे खासदार भावना गवळी 5 व्यांदा निवडून येण्यासाठी लढणार आहेत. पण त्यांच्या या मार्गात रोडा येथील नेते आणि राज्य सरकार मधील मंत्री संजय राठोड आहेत. या दोघांमध्ये मराठा विरूद्ध बंजारा असा संघर्ष आहे. दुसऱ्या बाजूस या ठिकाणी सत्तेविरोधी वारे देखील जोरात दिसत आहेत.
अमरावती मतदार संघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नवनीत कौर राणा त्यांना शह देतील. अशावेळी इथली लढत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नवनीत या अपक्ष उमेदवार रवि राणा यांच्या पत्नी आहेत. जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. या ठिकाणी सेना आणि भाजपा अंतर्गत राजकारणामुळे त्रस्त आहे.