रत्नागिरी : काँग्रेसचा प्रचार आता हिंदू महासभा करताना पहायला मिळणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात हे शक्य होणार आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट पहायला मिळाला. 'हिंदू महासभे'च्या उमेदवारानं चक्क काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकरांना पाठिंबा जाहीर केलाय. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य गावडे यांनी माघार घेतली आणि थेट नवीनचंद्र बांदीवडेकरांना जाहिर पाठिंबा दिलाय.
नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा संबंध वादग्रस्त संघटना 'सनातन'शी जोडला गेला. त्यांची काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली होती. काँग्रेसनं बांदिवडेकर आणि सनातन यांचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण देत या प्रकरणावर सारवा-सारवीचाही प्रयत्न केला होता. बांदिवडेकर सनातनची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं.
असं असताना आता पुन्हा एकदा हिंदू महासभेच्या उमेदवारांनी पाठिंबा जाहीर केल्यानं या मतदारसंघात नवीन समीकरणांची नांदी पहायला मिळणार आहे. गावडेंच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसची ताकद वाढेल, असा विश्वास बांदिवडेकरांनी व्यक्त केलाय.
नवीनचंद्र बांदिवडेकर यांची ओळख भंडारी समाजाचे नेते अशी आहे. ते 'अखिल भारतीय भंडारी समाज महासंघा'चे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ साठी त्यांना काँग्रेसकडून रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'दैनिक सनातन प्रभात'नं प्रकाशित केलेल्या वृत्तात वैभव राऊतला सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात बांदिवडेकर यांचंही भाषण झालं होतं. 'वैभव राऊत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झटला' या शब्दात बांदिवडेकर यांनी राऊतचं कौतुक केलं होतं. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन स्फोट तसंच डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात नाव समोर आल्यानं 'सनातन संस्था' वादग्रस्त ठरली होती.