विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेसाठी चुरस आता चांगलीच वाढली आहे. आतापर्यंत खैरेंनी एकहाती निवडणूक जिंकली आहे. मात्र यावेळी त्यांच्या समोर आव्हानं मोठी आहेत. यंदाची निवडणूक औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेंना घाम फोडणारी ठरते आहे. त्यामुळे खैरे सध्या पदयात्रेच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागत आहेत. गेली अनेक वर्षे खैरे हिंदुत्वाचं नाव घेऊन निवडणूक लढवत आहेत. मात्र यावेळी थेट मुस्लीमबहूल भागात खैरेंचा जोरदार प्रचार सुरू आहे.
खैरैंवर मतदार नाराज आहेत. त्यात त्यांच्याच पक्षाचा एक आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खैरैंविरोधात लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळं खैरैंच्या हक्काच्या मतांच विभाजन अटळ आहे. त्यात मतदारांवर प्रभाव टाकणारे शांतीगिरी महाराज यांनीही हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनीही हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं खैरैंच्या अडचणी वाढल्या आहेत.
शांतीगिरी महाराजांचा आशीर्वाद आपल्यालाच असल्याचं खैरे सांगत आहेत. तर सत्तारांमुळे काहीही फरक पडणार नसल्याचाही त्यांचा दावा आहे. खैरै यांनी आतापर्यंत फक्त जातीपातीचे राजकारण केलं असून त्यामुळं त्यांचा पराभव अटळ असल्याचं एमआयमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
जलील यांच्या उमेदवारीनं काँग्रेसच्या झांबड यांना फटका बसतो आहे. तर हर्षवर्धन यांच्या उमेदवारीनं खैरैंना फटका बसतो
आहे. यात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांनाच सध्या तरी फायदा दिसतो आहे. त्यामुळे औरंगाबादची लढत रंगतदार होत चालली आहे.