पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना वेगळं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समोर उभ्या असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या दिशेनं चालत जाऊन पार्थ पवार यांनी त्यांच्या हस्तांदोलन केले. दोन प्रतिस्पर्धी समोरासमोर आल्यानंतर त्यांचे समर्थक घोषणाबाजी करतात. मात्र याठिकाणचं चित्र सर्वांना सुखद धक्का देणारे होते. त्यामुळे या दोघांचे हस्तांदोलन करतानाचे फोटो काढण्यासाठी मोठी झुंबड उडाली. तत्पूर्वी दोघांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्तीप्रदर्शन केलं. पार्थचा अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार उपस्थित होते. तर बारणेंचा अर्ज दाखल करण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते.
शिरुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पुणे जीपीओपासून निघालेल्या मिरवणुकीत कार्यकर्ते मोठ्या संख्येंन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करतेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. सध्या देशातील हवा बदलत असून सर्वत्र चौकीदार चोर है ची चर्चा सुरु असल्याचं ते यावेळी म्हणाले. तर आपण विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात असल्याचं सांगत अमोल कोल्हे यांनी विजयाची खात्री व्यक्त केली.
शिरुरचे शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. गेल्या १५ वर्षात कधीच जात काढली नाही, विरोधी पक्षांचं हे राजकारण असल्याची टीका यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. तर पहिला मुद्दा धनुष्यबाण आणि कमळाचा, त्या नंतर आम्ही
दिलेली वचनं पूर्ण करु असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
ज्याला देशात मतदानाचा अधिकार आहे तो देशात कुठल्याही मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा राहू शकतो त्यामुळे मी बाहेरचा उमेदवार असल्याचा विरोधक अपप्रचार करीत असल्याचा आरोप नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसतर्फे नागपुरात शक्तिप्रदर्शन करत बाईक आणि स्कूटर रॅली काढण्यात आली. नागपूरच्या वेरायटी चौकापासून या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत नाना पटोले यांनीही स्वतः बाईक चालवत सहभाग घेतला.