1 Dec 2024, 09:53 वाजता
वीजबिलाची थकबाकी भरा, नाहीतर कारवाईला सामोरे जा! महावितरणकडून अभय योजनेला मिळाली 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे, त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. जागामालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई मात्र होऊ शकते. अभय योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत आहे.
1 Dec 2024, 09:53 वाजता
पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क भरण्यास मुदत दिली होती. परंतु, शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
1 Dec 2024, 09:49 वाजता
सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार 1200 रुपये दंड, दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई
पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आल्याने नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना 1200 रुपये दंड भरावा लागणार असून निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता आहे. आत्तापर्यंत प्रवासांच्या तक्रारीनुसार दोन कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
1 Dec 2024, 09:49 वाजता
पुण्यातील फुकट्या प्रवाशांकडून 76 लाख रुपयांच्या दंडाची वसुली
पुण्यातील पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून 76 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. 10 महिन्यांत 15 हजार प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्यास समोर आलं आहे. 1 जानेवारी ते 31ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या 15 हजारांवर पोहोचल्याचं उघड झालं आहे. दररोज सरासरी 65 प्रवासी करतात विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून पीएमपीकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना 50 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. प्रवाशांनी तिकीट काढले तपासणी वेळी ते हरवले तरी 500 रुपये दंड भरावा लागतो.
1 Dec 2024, 09:48 वाजता
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ
GAS : आजपासून नव्या महिन्याला सुरुवात झाली आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरमागे 16.52 रुपयांची वाढ करण्यात आलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं गॅसच्या किमती वाढवल्यात. एका सिलेंडरची किंमत 1 हजार 771 रुपये असणारेय. याचा हॉटेल व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता असून हॉटेलमधील जेवणही महागण्याची शक्यताये.
1 Dec 2024, 09:47 वाजता
मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे-दिल्ली-पुणे विशेष रेल्वे
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे-दिल्ली-पुणे विशेष रेल्वेची व्यवस्था दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी पुण्यातून दिल्लीला जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. देशाच्या राजधानीत दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वेमंत्री यांच्याकडे स्पेशल ट्रेन सोडण्याची विनंती केली होती. केंद्रीय रेल्वे मंत्राकडून मुरलीधर मोहळ यांची विनंती मान्य करण्यात आली आहे. पुणे ते नवी दिल्ली दरम्यान 19 फेब्रुवारी 2025 रोजी आणि नवी दिल्ली ते पुणे दरम्यान 24 फेब्रुवारी 2025 रोजी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.
1 Dec 2024, 09:46 वाजता
राज्यात चाललंय काय? आता थंडी कमी होणार अन् पाऊस पडणार
उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने नाशिकमध्ये थंडीची लाट उसळली आहे. शनिवारी हंगामातील नीचांकी 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आठवडाभरापासून मुंबईसह राज्यभरात नोंदविण्यात येणारा किमान तापमानाचा पारा आता वाढणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील थंडी काहीशी कमी होणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतातील चक्री वादळामुळे पश्चिम, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील, हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांनी सांगितले की, दक्षिणेकडील चक्री वादळाचा परिणाम म्हणून सोमवारपासून गुरुवारपर्यंत मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
1 Dec 2024, 09:44 वाजता
पुण्यातील पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात
पुणे महापालिकेने शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे. काही जुन्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्ट’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तपासणी करण्याचा निर्णय ही पालिकेने घेतला आहे. पुणे शहरातील 80 पुतळे अधिकृत आहेत. त्यातील 24 पुतळे हे 40 ते 45 वर्ष जुने आहेत. यातील काहींची डागडुजी करण्यात येणार आहेत तर काहींची अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्टने तपासणी केली जाणार आहे.
1 Dec 2024, 09:42 वाजता
नोव्हेंबरमध्ये 1.40 कोटी लोकांचा विमान प्रवास; भारतीय हवाई क्षेत्राचा आजवरचा उच्चांक
नोव्हेंबर महिन्यात तब्बल 1 कोटी 40 लाख लोकांनी विमान प्रवास केला आहे. हा भारतीय विमान क्षेत्रातील प्रवासी संख्येचा आजवरचा उच्चांक ठरला आहे. प्रवासी संख्येची ही आकडेवारी 29 नोव्हेंबरपर्यंतची असून, 1 ते 29 नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशात एकूण 91 हजार 728 विमान फेऱ्या झाल्या आहेत. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये 1 कोटी 37 लाख 97 हजार 352 प्रवाशांनी विमान प्रवास करत विक्रम रचला होता. मात्र, तो विक्रम या महिन्यात मोडला गेला आहे. या महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, 17 नोव्हेंबर या एका दिवसात 5 लाख 5 हजार 412 लोकांनी प्रवास करत विक्रमी संख्या गाठली होती. मात्र, हा विक्रम त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे रविवारी मोडला गेला.
1 Dec 2024, 09:40 वाजता
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 5 दिवस पाणीकपात
मुंबई महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. 1 आणि 2 डिसेंबरदरम्यान हे काम होणार आहे; मात्र या कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे व भिवंडी महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत 10 टक्के कपात करण्यात येणार आहे. पिसे येथून ठाणे आणि भिवंडीलाही पाणीपुरवठा होतो. ठाणे आणि भिवंडी येथून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या मुंबईपर्यंत येतात. त्यामुळे या दोन्ही शहरांना पाणीपुरवठ्यातील काही वाटा दिला जातो. दुरुस्तीच्या कामामुळे साहजिकच या दोन्ही शहरांच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.