प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रागयडमध्ये(Raigad) जिवंत स्फोटकं(Live explosives) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात ही स्फोटक सापडली आहेत. स्फोटकं सापडल्याने रायगड जिल्ह्यात दहशत पसरली आहे. ही स्फोटकं जिवंत असल्याने हा घातपाताचा कट तर नव्हताना असा प्रश्न उपस्थित केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ही स्फोटकं निकामी करण्यात आली आहेत. पोलिस या प्रकाराचा कसून तपास करत आहेत.
पेण जवळ असलेल्या भोगावती नदीपात्रात सापडली स्फोटकं
रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळ असलेल्या भोगावती नदीपात्रात पुलाखाली स्फोटके सापडली आहेत. पुलाजळून जाणाऱ्या स्थानिकांना ही स्फोटकं दिसली. यानंतर तात्काळ याबाबत पोलिसांना कळवण्यात आले.
ही स्फोटके म्हणजे जिलेटीन आणि डीटोनेटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे जिलेटीन जिवंत असून त्याला टायमर लावलेला दिसत आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. ही स्फोटक नदी पात्राबाहेर काढून ती निकामी करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. ही स्फोटके नदीपात्रात कशी आली याचा पोलिस शोध घेत आहेत.
यापूर्वी देखील रायगड जिल्ह्यात स्फोटक सापडली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी रागयड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या संशयीत बोटीमुळे देखील दहशत पसरली होती.