सागर आव्हाड / पुणे : Lashkar-e-Tayyaba Recruitment : फेसबुकवर तयार केलेले पाच बनावट अकाउंट, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपवर केलेले चॅटींग आणि त्या ग्रुपमधील अन्य सदस्यांबाबत तसेच लष्कर-ए-तय्यबा (Lashkar-e-Taiba) संघटनेत भरती करण्याच्या अनुषंगाने पाठविण्यात आलेला निधी याबाबत पकडण्यात आलेल्या संशयीत आरोपी मोहम्मद जुनैद मोहम्मद आता (24, रा. दापोडी) याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडील चौकशीत काही महत्वपूर्ण माहिती एटीएसच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी (Lashkar e taiba) काम करणाऱ्या जुनैद या तरुणाला पुण्यातून (Pune)अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. त्याला एटीएसच्या टीमने पुण्यातील दापोडी (Dapodi) येथून अटक केली आहे.
भारतात घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी, जातीय सलोखा धोक्यात आणण्यासाठी तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुण्यातील तरुणाला बंदी असलेल्या लष्कर-ए-तय्यबा (Lashkar-e-Taiba) या संघटनेत भरती केल्याचा धक्कादायक प्रकार दहशतवादी विरोधी पथकाने (ATS)नुकताच उघड केला. याप्रकरणात तिघे फरार असून तिघेही मुळचे जम्मू काश्मीर येथील आहे. तिघेही लष्कर-ए-तय्यबा (Lashkar-e-Taiba) संबधीत आहेत.
2021 ते एप्रिल 2022 दरम्यान फरार असलेल्या जुनैदचा साथीदार याने एक अन्सर गझवात हिंद/तवाहीद नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून देश विरोधी पोस्ट व दहशादासंबंधी पोस्ट टाकून ग्रुप मधील इतर सदस्यांना उत्तेजित केले जात होते. त्याच ग्रुपमध्ये जुनैद हा देखील सहभागी असल्याचे एटीएसने केलेल्या तपासात समोर आले. त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला जात आहे. त्याचबरोबर तो सहा वेळा जम्मू-काश्मीरला गेला होता. तेथे तो नेमका कोठे आणि कोणाला भेटला याचीही माहिती त्याच्याकडून घेण्यात येत आहे.
जुनैदच्या बँक खात्यावर पैशाच्या अनुषंगानेही एटीएस तपासणी करत आहे. जुनैदने फेसबुकवर वेगवेगळ्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे दोन साथीदारांनी मिळून लष्कर-ए-तय्यबा (Lashkar-e-Taiba)या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेत भरती करण्यासाठी व त्यांना दारुगोळा व शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देऊ, भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विविध गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षिततेला बाधा येईल, असे घातपाती आणि दहशतवादी कृत्य घडवून भारतातील धार्मिक ऐक्य आणि जातीय सलोखा धोक्यात आणून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला.
त्या ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील, महाराष्ट्रातील तसेच भारतातील किती संशयीत यामध्ये सहभागी झाले याचाही तपास सुरू करण्यात येत आहे. याबाबत एटीएसच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक मनिषा भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
लष्कर ए तैयबा या संघटनेसाठी आर्थिक पुरवठा कोण करते, नवीन भरती करून त्यांना कोठे पाठवले जाते, जुनैदने कोणाला प्रशिक्षणासाठी पाठवले का ?, देशातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली ? घातपात व दहशतवादी कारवायासाठी शस्त्रास्त्रसाठी आला आहे का ? जिहादच्या नावाखाली त्या फरार दोन साथीदारांनी त्याचे ब्रेनवॉश केल्याचे त्याने न्यायालयात सांगितले होते. नेमके हे दोघे त्याच्या संपर्कात कधी आले. त्यांनी कशा पध्दतीने एलईटीच्या कामात ओढले याचाही जुनैदकडे तपास सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.