सागर आव्हाड, झी मीडिया
Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली असून दिवाळी पाडव्याच्याच दिवशी असा प्रकार घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune News Today)
पुण्यातील टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोयत्या गँगची दहशत वाढल्यानंतर पुणे पोलिसांनी शहरात कोयते विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी शहराच्या मध्यवस्तीतील कोयते विक्री करणाऱ्या ठिकाणांहून कोयतेही जप्त केले आहेत. तरीही ऐन दिवाळीत कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.
अक्षय मलाप्पा शिंगे (वय २५, रा. महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शिंगे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहतीनुसार, अक्षय आणि त्याचे मित्र करण धिवार, मुज्जमीर शेख दिवाळीनिमित्त टिळक रस्त्यावर कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी फिरत असताना पदपथावरुन आलेल्या तिघांनी शिंगेवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक नानेकर तपास करत आहेत.
दरम्यान साताऱ्यातही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. घरासमोर फटाके फोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून कराड मध्ये युवकावर भर चौकात कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.ओम बामणे असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. हल्ला करणाऱ्या एका संशयिताला बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी पकडले असून दोन जण पळून गेले आहेत. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.