'मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये...'; सेमी-फायलनमध्ये हरण्याच्या भीतीसंदर्भात रिचर्ड्सन यांचा सल्ला

Viv Richards On Indian Semi Final : 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही जेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेला आणि पराभूत करण्यास अशक्य वाटणारा भारतीय संघ सेमीफायलनमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. तर मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कपमधून भारतीय संघ बाहेर पडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 14, 2023, 10:23 AM IST
'मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये...'; सेमी-फायलनमध्ये हरण्याच्या भीतीसंदर्भात रिचर्ड्सन यांचा सल्ला title=
आयसीसीबरोबर बोलताना केलं विधान

Viv Richards On Indian Semi Final : वर्ल्ड कप 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार भारतीय संघ हा एकही सामना पराभूत न होता सेमी-फायलनमध्ये पोहोचणारा संघ ठरला आहे. भारताने रविवारी नेदरलॅण्डला पराभूत करत आपला साखळीफेरीतील शेवटचा आणि नववा सामना जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने या सामन्याआधीच सेमी-फायलनमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. आता सेमी-फायनल्समध्ये भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

भारताचा सतत पराभव

भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये साखळीफेरीत वर्चस्व कायम राखलं आहे. असं असलं तरी सेमी-फायलनच्या सामन्यामध्ये भारतीय संघ कच खाऊ शकतो अशी भीती चाहत्यांना आहे. 2013 नंतरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर वारंवार भारतीय संघाबरोबर हेच होत आलं आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही जेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेला आणि पराभूत करण्यास अशक्य वाटणारा भारतीय संघ सेमी-फायलनमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. तर मागील वर्षी T-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताला इंग्लंडच्या संघाने पराभूत केलं. हा पराभवही सेमी-फायलनच्या सामन्यातच झाला होता.

...तर वेगळा निकाल

आयसीसीबरोबर बोलताना वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू विव्ह रिचर्ड्सन यांनी भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या स्पर्धेमध्ये भारत ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहून रिचर्स्डसन यांनी भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे. सेमी-फायनलमध्ये येऊन एका वाईट सामन्यामुळे स्पर्धेबाहेर पडण्याची भीती वाटत असलेल्या भारतीय संघाना विव्ह रिचर्ड्सन यांनी, "यंदाच्या वर्षात झालेल्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ अशा विचारसरणीने खेळत आहे की ते अगदी शेवटच्या सामन्यामध्येही असेच खेळतील. त्यांची विचारसरणी अशीच असली पाहिजे आणि मला ही विचारसरणी योग्य वाटते. मी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये असतो तर माझी विचारसरणीही अशीच असती की चला सर्व ताकदीने मैदानात उतरुयात. आतापर्यंत याच विचारसरणीने भारतीय संघ खेळला आहे आणि तो अगदी योग्य पद्धतीने त्यांच्या कामी आला आहे. मात्र यामध्ये बदल झाला तर विचित्र निकाल लागू शकतो," असा इशारा दिला आहे.

ते विचार डोक्यातून काढा...

"मला वाटतं ते संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहतील. मागील बऱ्याच काळापासून ते याचाच प्रयतन् करत होते. मात्र यावेळेस त्यांना आतापर्यंत आपण फार छान खेळलो आहोत पण सेमी-फायनलच्या सामन्याचा विरोधात निकाल लागू शकतो, असं वाटू शकतं. असं असेल तर त्यांनी हे विचार डोक्यातून काढले पाहिजेत. खरं तर सर्व नाकारात्मक विचार त्यांनी डोक्यातून काढायला हवेत," असा सल्लाही विव्ह रिचर्ड्सन यांनी दिला आहे.

भारतासाठी सर्वात यशस्वी फलंदाज आणि गोलंदाज

भारतीय संघासाठी यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये विराट तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 8 सामन्यांमध्ये 543 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेस आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीमध्ये मोहम्मद शामी हा चौथ्या स्थानी आहे. त्याने एकूण 16 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने 15 तर रविंद्र जडेजाने 14 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादवने 12 आणि मोहम्मद शामीने 10 विकेट्स घेतल्या आहेत.