मुंबई : ख्रीसमस आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वेने प्रवाशांना भेट दिली आहे. २१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान सीएसएमटी ते करमाळी दरम्यान १६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
नविन वर्ष आणि ख्रिसमसनिमित्त पर्यटक आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ख्रीसमस आणि नविन वर्षादरम्यान प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेनं १६ विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतलाय.
प्रवाशांच्या सोयीसाठी २१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी या स्थानकांदरम्यान धावणार आहेत.
या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहेत. या सर्व गाड्या १४ डब्यांच्या असून त्यांना एसी टू टायरचा एक कोच, एसी थ्री टायरचे ५ कोच, सेकण्ड स्लीपर क्लासचे ६ कोच, जनरलचे २ कोच आहेत.
मुंबई-करमाळी-मुंबई विशेष सुपरफास्ट (४ फेऱ्या) ट्रेन क्रमांक ०२०२५ ही विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस २१ आणि २८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ०२०२६ ही सूपरफास्ट एक्स्प्रेस करमाळी येथून २१ आणि २८ डिसेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटेल.
तर मुंबई-करमाळी-करमाळी विशेष (८ फेऱ्या ) ट्रेन क्रमांक ०२०२७ ही ट्रेन २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ०२०२८ ही ट्रेन २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २ वाजता निघेल.
मुंबई-करमाळी-मुंबई एक्स्प्रेस (४ फेऱ्या) ०२०२९ ही ट्रेन २५ डिसेंबर २०१७ आणि १ जानेवारी २०१८ रोजी सीएसएमटी येथून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी निघेल. तर करमाळी येथून याच दिवशी दुपारी २ वाजता सुटेल.