'मर्डरला एक वर्षे पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी', स्टेटस ठेवणाऱ्या गुन्हेगारास पुन्हा बेड्या

तुरुंगाची हवा खाऊन आल्यावरही गुंडाची रग जिरली नाही. 

Updated: Dec 24, 2020, 08:02 PM IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील इचलकरंजीमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि तुरुंगात टाकलं. यानंतर तो सुधारेल अशी अपेक्षा साऱ्यांना होती. बाहेर येऊन सर्वसाधारण आयुष्य जगेल असं साऱ्यांना वाटत होत. पण प्रत्यक्षात याच्या विरुद्धच झालं. तुरुंगाची हवा खाऊन आल्यावरही गुंडाची रग जिरली नाही. त्यामुळे गुन्हेगाराला पुन्हा तत्काळ गजाआड व्हावं लागलंय. 

इचलकरंजी शहरातील एका खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर असणाऱ्या आरोपीने आपल्या व्हाट्सएपच्या स्टेट्सला 'मर्डरला एक वर्षे पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी' असा व्हिडीओ लावला.  

या स्टेट्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करू पाहणारा आरोपी आकाश वासुदेव याला शिवाजीनगर पोलिसांनी पोलीसी हिसका दाखवीत त्वरीत अटक केलीय. आरोपीने पुन्हा खुनाची तयारी सुरू केली आहे का ? अशी चर्चा शहरात होती.