प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : 21 लाखांच्या नवा कोऱ्या निंजा झेडएक्स 10 आर (Kawasaki Ninja ZX-10R) बाईक जाळल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडला आहे. जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात (Kolhapur) कळंबा येथे राहणाऱ्या राजेश चौगले या तरुणाने दीपावलीच्या (Diwali) मुहूर्तावर कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर (Kawasaki Ninja ZX-10R) ही 21 लाखांची नवीकोरी गाडी कोल्हापुरात आणली होती. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने नव्याकोऱ्या बाईकची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकही काढली होती. मात्र आता या आलिशान बाईकसह इतर तीन गाड्यांचाही चुराडा अज्ञातांनी केला आहे.
वाजत गाजत आणलेली ही 21 लाखांची दुचाकी शुक्रवारी पहाटे अज्ञातांकडून पेटवून देण्यात आली. या दोन दुचाकी सोबत एक कारही जळाली आहे. दिवाळीत निखिल पजई यांनी पत्नी पल्लवी यांच्या नावाने ही गाडी घेतली होती. मेहुणा राजेश चौगले याच्या दारात ही गाडी लावली होती. मात्र पहाटे 21 लाखांच्या निंजा बाईक या गाडीसह राजेश चौगले याच्या चारचाकी गाडीलाही आग लावल्याचे दिसून आले. हौशेने घेतलेल्या गाड्या वाजत गाजत त्यांनी घरी आणल्या होत्या. मात्र आज या आगीत जळून खाक झाल्या.
दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण आपल्या घरात नवीन गाडी, टीव्ही आदी वस्तू खरेदी करत असतात. कोल्हापूरातील कळंबा येथे राहणाऱ्या राजेश चौगले या तरुणाने सुद्धा कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर ही गाडी खरेदी केली होती. एवढयावरच न थांबता त्याने या गाडीची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढली होती. या गाडीची किंमत एक दोन लाख नसून ऍक्सेसरीज धरून तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच गाडी असल्याने त्याने सुद्धा याचे जंगी स्वागत केले होते.याचे व्हिडिओ प्रंचड प्रमाणात सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाले होते.
राजेश चौगले हा शेअर मार्केटिंग चा व्यवसाय करतो. त्याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे याआधी सुद्धा बुलेट तसेच इतर स्पोर्ट्स बाईक आणि कार आहे. मात्र यावर्षी त्याने तब्बल 21 लाखांची कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर गाडी घ्यायचे ठरवले आणि या दिवाळीत खरेदी केली. या गाडीची आणि तिचे जोरदार पद्धतीने केलेल्या स्वागताची कोल्हापूरात जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसात तक्रार दाखल, पण राजेशचा कोणावरही संशय नाही
राजेशची गाडी जळून खाक झाल्यानंतर राजेशने कोल्हापुरातली करवीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी राजेशचा जबाब घेवून तक्रार दाखल केलीय. पण या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे राजेशने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे जर राजेशचे कोणाबरोबर शत्रुत्व नाही तर मग त्याच्या गाड्या कुणी आणि का जाळल्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.