Khalapur Irsalwadi Landslide : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे (Rainfall) नागरिकांचे हाल होत आहेत. पावसामुळे रायगड जिल्ह्यात 19 जुलै रोजी रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालापूर (Khalapur) तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याने (Irsalwadi Landslide) सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रात्रीच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली 16 ते 17 घरे दबल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मदत कार्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. पण बुधवारी रात्री इरसालवाडीत नेमकं काय घडलं?
अपघाताच्या वेळी गावात किती लोक होते याचा अंदाज बांधणे कठीण आहे. रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 75 जणांची सुटका करण्यात आली आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे 100 हून अधिक अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत. रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एनडीआरएफ, स्थानिक लोक आणि काही स्वयंसेवी संस्थांची मदत मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे चार पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
असा आहे संपूर्ण घटनाक्रम -
बुधवारी रात्री उशिरानं रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या आदिवासी वस्ती असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळल्यामुळं मोठं संकट ओढावलं आहे. साधारण रात्री 10.30 च्या सुमारास मासेमारी करून या गावातील काही लोक घरी जात होते. त्यावेळी 11 वाजता त्यांना डोंगराचा काही भाग खचत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काही वेळाने घरं माती खाली गेल्याचे त्यांनी पाहिलं आणि तात्काळ याची माहिती गावातील सरपंच आणि गावकऱ्यांना दिली. त्याचवेळी काही शाळकरी मुलं वाडीमध्ये मोबाईलवर गेम खेळत होती. त्यांना डोंगराचा भाग खाली आल्याचे दिसून आले आणि त्यांनी दरड कोसळल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचलवली.
त्यानंतर 12 वाजता स्थानिक पोलीस आणि तहसील कार्यालयापर्यंत ही माहिती पोहोचली. त्यानंतर 12 : 30 वाजता स्थानिक पोलीस व रुग्णवाहिका इतर प्रशासन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान स्थानिक आमदार महेश बालदी हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मंत्री गिरीश महाजन हे तीन वाजता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मंत्री उदय सामंत हे देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला.
पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांच्या शोधकार्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील इरशालवाडीच्या पायथ्याशी दाखल झाले होते. मात्र पाच वाजण्याच्या सुमारास वर जात असताना एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी साडेपाच वाजेपर्यंत चार जणांचे मृतदेह आणि 25 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इरशालवाडीमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खाली आल्यानंतर मुख्यंत्र्यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली.
11am | 20-07-2023Vidhan Bhavan, Mumbai | स. ११ वा | २०-०७-२०२३विधानभवन, मुंबई.
LIVE | रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेसंदर्भात विधानसभेत निवेदन. #Raigad #maharashtra
(Deffered Live) https://t.co/eeONzz4AxW— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2023
10 मृतदेह सापडले - देवेंद्र फडणवीस
या वाडीत वास्तव्यास असणाऱ्या 48 कुटुंबांपैकी 25 ते 28 कुटुंबं बाधित झाल्याचा अंदाज आहे. 228 पैकी 70 नागरिक घटनेवेळी सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. तर 21 लोक जखमी असून 17 लोकांवर तात्पुरत्या स्वरूपातील उपचार करण्यात आले आहेत. सकाळी 10.15 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देताना सांगितलं आहे.