कल्याण हादरलं! आईसमोरच 12 वर्षांच्या मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला; बिल्डिंगमधील थरारक घटनाक्रम

Kalyan Crime News: आई आणि मुलगी गप्पा मारत मारत घरी जाताना इमारतीच्या आवारामध्ये शिरले असता अचानक एका तरुणीने या 12 वर्षांच्या मुलीवर चाकूने हल्ला केला. आईसमोरच त्याने या मुलीला अनेकदा भोसकलं. आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या हल्लेखोराने या महिलेला धक्का देत दूर लोटलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 17, 2023, 10:21 AM IST
कल्याण हादरलं! आईसमोरच 12 वर्षांच्या मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला; बिल्डिंगमधील थरारक घटनाक्रम title=
इमारतीच्या आवारामध्येच हा सारा प्रकार घडला

Kalyan Crime News: कल्याणमधील तिसगाव परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करुन तिची हत्या केली आहे. ही तरुणी आपल्या आईबरोबर घरी जात असतानाच तिच्यावर एका तरुणाने अचानक प्राणघातक हल्ला केला. यात या तरुणीचा मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी तिच्या आईबरोबर घरी जाताना सोसायटीच्या आवारामध्ये शिरली असता तिच्यावर हल्ला झाला. हल्ले खोर समोरुन आला आणि या मुलीवर वार करण्यास त्याने सुरुवात केली. या मुलीवर तरुणाने 7 ते 8 वेळा वार केले. यानंतर हा तरुण घटनास्थळावरुन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच नागरिकांनी त्याला पकडलं. जखमी अवस्थेत या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, माय-लेक इमारतीच्या गेटमधून बोलत बोलत आत आल्यानंतर इमारतीच्या कंम्पाऊण्डजवळ लपून बसलेल्या या तरुणाने अचानक या मुलीवर हल्ला केला. या मुलीवर तरुणाने चाकूने वार केले. मुलीला वाचवण्यासाठी तिच्या आईने हल्लेखोराला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर या महिलेला बाजूला ढकलून मुलीवर चाकूने वार करत राहिला.

तपास सुरु

इमारतीखाली अचानक जोरदार आवाज होऊ लागल्याने इमारतीमधील अनेकजण पटापट खाली उतरुन आले. हल्लेखोर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला इमारतीमधील काहीजणांनी पकडून ठेवलं. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हल्ला करणाऱ्या हल्लेखोची ओळख पटली असून त्याचं नाव आदित्य कांबळे असं आहे. या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र अचानक आदित्यने या मुलीवर का हल्ला केला यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

आईला धीर देण्याचा प्रयत्न

हल्लेखोराने या मुलीच्या आईला धक्का दिल्याने त्या जमीनीवर पडल्या. त्यानंतर आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. इमारतीमधील नागरिकांनी या मुलीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं. मात्र दुसरीकडे या मुलीची आई इमारतीखालीच रडत होती. या माहिलेला धीर देण्याचा प्रयत्न स्थानिक महिला करत होत्या. मात्र अचानक झालेल्या या हल्लामुळे गोंधळून गेलेल्या महिलेला नेमकं काय करावं हे कळत नव्हतं. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर सोसायटीत चाकू हल्ला करून हत्या झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.