जायकवाडी पाण्याचा वाद : गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती

पाटबंधारे विभागाकडून नवीन निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय

Updated: Nov 2, 2018, 09:01 AM IST
जायकवाडी पाण्याचा वाद :  गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती title=

नाशिक / औरंगाबाद : जायकवाडीसाठी नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादाने आता नाट्यमय वळण घेतलेय. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या आदेशान्वये बुधवारी गंगापूर, दारणा धरणातून पाणी सोडल्यानंतर ते नांदूरमधमेश्वरपर्यंत पोहचले असतानाच पाटबंधारे खात्याने गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास तात्पुरती स्थगिती दिलीय.

नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याची तूट होण्याची शक्यता आणि सिंचनाचा प्रश्न असल्यानं जलसंपदा विभागानं तात्काळ काढण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गंगापूर धरणाचे तिन्ही दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. 

मात्र दारणा, पालखेडमधून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय. पाटबंधारे खात्याच्या या निर्णयामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असला तरी, सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत म्हणजे साडे आठ तासांत ८० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आलंय.

एकूणच या स्थगितीनंतर पुन्हा एकदा नाशिक आणि मराठवाडा यांच्यात पाणी संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं आता पाटबंधारे विभागाकडून नवीन निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

रामकुंडात पूरसदृश्य परिस्थिती 

दरम्यान, गोदावरी नदीच्या धरणांमधून पाणी सोडल्यानंतर खबरदारी न घेतल्यामुळे नाशिकमधल्या रामकुंडाच्या किनाऱ्यावरील अनेक चार चाकी वाहनं पाण्यात गेली तर काही वाहनं वाहून गेली. त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे रामकुंडात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. 

रामकुंड परिसरात एवढं पाणी बाहेर येणार असल्याची सूचना देण्यात आली असती तर किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांचं नुकसान टाळता आलं असतं. पावसळ्यात रामकुंडात ज्याप्रकारे चित्र निर्माण होतं तसंच चित्र पाणी सोडल्यामुळे आता नोव्हेंबरमध्येही पाहायला मिळतंय.