'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले

Jalna Maratha Protest Raj Thackeray Slams Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी जालन्यामध्ये आंदोलकांची भेट घेतली. याचवेळेस त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 4, 2023, 12:37 PM IST
'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले title=
राज ठाकरेंनी जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली

Jalna Maratha Protest Raj Thackeray Slams Devendra Fadnavis: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यामधील अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने राज्यभरामध्ये संताप व्यक्त केला जात असून मराठा संघटनांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावरुन राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र याच सल्ल्यावरुन राज ठाकरेंनी फणवीसांवर आंदोलकांमध्ये जाऊन हल्लाबोल केला. 

त्यांना मराठवाड्यामध्ये पाऊल ठेऊ देऊ नका

राज ठाकरे आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहोचले. त्यांनी 10 ते 15 मिनिटं मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आंदोलकांशी संवाद साधताना अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून सत्ताधारी केवळ समाजाची फसवणूक करत असल्याचा घणाघात केला. "सत्ताधारी सतत तुमच्यासमोर पुतळ्यांचं, आरक्षणाचं राजकारण करतात. मतं पदरामध्ये पाडून घ्यायची आणि मतं पडली की तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचं. मी आज भाषण करायला नाही विनंती करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसवल्या, बंदुकीतून गोळ्या मारायला लावल्या. त्या सर्व लोकांना पहिल्यांदा मराठवाडा बंदी करुन टाका. पाऊल ठेवू देऊ नका त्यांना जोपर्यंत केलेल्या गोष्टीची ते माफी मागत नाहीत," असं राज ठाकरे म्हणाले.  

राज ठाकरे फडणवीसांवर बरसले

राज ठाकरेंनी पुढे बोलताना थेट देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला. "काल मी कुठेतरी ऐकलं देवेंद्र फडणवीस म्हणाले, झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करु नये. अरे वा..!! हे जर विरोधी पक्षात असते तर यांनी काय केलं असतं हेच केलं असतं ना राजकारण. मी काय राजकारण करायला आलेलो नाही," असं म्हणत राज यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

नक्की वाचा >> '...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; 'मराठवाडा बंदी'चा उल्लेख करत राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला

राज ठाकरेंनी दिलं आश्वासन

पुढे बोलताना राज यांनी, "मी ते फुटेज पाहिलं. ज्यापद्धतीने माझ्या माता-भगिनींवर लाढ्या बसरत होत्या ते मला बघवलं नाही. आता यांनी मला काही विषय सांगितले आहेत. मी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालेन. त्याचं काय होईल माहीत नाही. मला खोटं बोलता येत नाही. खोटी आमिषं दाखवता येत नाही. मी मुख्यमंत्र्यांशी, तज्ज्ञांशी बोलेन आणि विषय सोडण्यासारखा असेल तर नक्की सोडवू," असं आश्वासन राज ठाकरेंनी आंदोलकांना दिलं.