जळगाव आगाराच्या जुन्या बस, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहेत.

Updated: May 10, 2018, 03:14 PM IST

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या एसटी बसमधून प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. एकीकडे एसटीची प्रवासी संख्या वाढावी, यासाठी सरकार विविध प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे एसटीची अवस्था ही अतिशय दयनीय झालीय. राज्य परिवहन महामंडळाची लाल एसटी बस ही जनतेत सर्वाधिक लोकप्रिय, जिथं रस्ते नाहीत, दुर्गम भाग असो की, खेड्यापाड्यात जाण्याचा प्रवास हा एसटी बसद्वारे प्रवाशी करतात. एकीकडे एसटी महामंडळ नफ्यात आहे, लोकांचा कल एसटीकडे वाढता आहे.

मग दुसरीकडे एसटीच्या दयनीय अवस्थेकडं महामंडळाचे दुर्लक्ष का होतंय. राज्य परिवहन महामंडळाचा जळगाव विभागाचाच पहा. उत्पन्नाच्या बाबतीत गेल्या काही दिवसांत जळगाव विभाग राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. विभागाच्या उत्पन्नात १ कोटी ९१ लाखांने वाढ झाली असून भारमान ७० टक्के आहे.

जळगाव बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात असलेली अस्वच्छता, तसेच इतर प्राथमिक सुविधांची नेहमीच वानवा असते. कालबाह्य झालेल्या बसेस मधून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करून या एसटी बस द्वारे वाहतूक केली जातेय. 

जशी अवस्था एसटी बसेसची आहे, तशीच राज्यातील बहुसंख्य बस स्थानकांच्या आवारांची आहे. गेली कित्येक वर्षे जळगावच्या बसस्थानकाचे मजबुतीकरण करण्यात आलेलं नाही. यामुळं धुळीचाही प्रवाश्यांना प्रचंड त्रास आहे. असंख्य समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या जळगावच्या बसस्थानकाला लवकरच समस्यासमुक्त करावे हीच मागणी प्रवासी करतायत.