अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरातल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाची शान असलेल्या, जाई वाघिणीचा मृत्यू झाला आहे. गेल्या साडे चार महिन्यांपासूनचा तिचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष संपलाय. तिचा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला. जाई, महाराजाबागची शान होती, जान होती, रुबाबदार आणि करारी होती, साडे चार महिने तिनं मृत्यूला झुंजवत ठेवलं.अखेर तिचा मृत्यूशी संघर्ष संपला, आणि महाराजा बागेत एकच शोककळा पसरली. जाई वाघिणीच्या पिंज-याजवळ पाच नोव्हेंबर २०१७ ला साप दिसला होता. साप चावल्यामुऴे काही दिवसातच तिची तब्येत बिघडली.
तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी तिची प्रकृती सुधारत होती. पण नंतर तिचं यकृत बिघडलं आणि अखेरजाईचा मृत्यू झाला. आईपासून दुरावलेल्या जाई आणि जुई या दोन वाघिणींना 2008 नोव्हेंबरमध्ये चंद्रपूरच्या जंगलातून महाराजबागेत आणण्यात आलं होतं. काही दिवसांतच जुईचा मृत्यू झाला. पण जाई मात्र गेली दहा वर्षं महाराजाबागची शान होती.
जाईच्या जाण्यामुळे महाराजाबागेतल्या सगळ्यांनाच हुरहुर लागली आहे. जाईला प्रेमानं निरोप देण्यात आला.