अखेर आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी आई-लेकराला एकत्र आणलं

सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत होता.

Updated: Apr 2, 2019, 12:01 PM IST
अखेर आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी आई-लेकराला एकत्र आणलं title=

नाशिक : सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये एक महिला सांगत होती की, माझा एक मुलगा पीएसआय तर दुसरा मुलगा कंडक्टर आहे. प्रमिला पवार अशा या वृद्ध महिलेचं नाव आहे. ही महिला गेल्या अनेक दिवसांपासून बाहेरच होत्या. मुले त्यांचा सांभाळ करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण अखेर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पुढाकार घेतला आणि या माऊलीला न्याय मिळवून दिला. 

तीन वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेलेल्या 61 वर्षीय या महिलेला पोलिसांच्या प्रयत्नामुळे निवारा मिळाला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या मुलांना शोधण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर पुढे आलं की त्यांचा मुलगा सतीश हे वस्तू व सेवा कर विभागात अधीक्षक आहेत. तर दुसरा मुलगा कंडक्टर आहे. पतीच्या निधनानंतर या माऊलीने दोन्ही मुलांना मोठं केलं. दोघांची लग्न करुन दिली. पण त्यानंतर मात्र घरात वातावरण बदललं. नोकरीनिमित्त दोघेही दुसऱ्या गावाला गेले. पण ही आई मात्र एकटी पडली.  
  
प्रमिला नाना पवार यांची कथा जगासमोर आल्याने अनेकांमध्ये संतापाची लाट होती. प्रमिला पवार यांनी म्हटलं की, 'दोन्ही मुले सांभाळ करत नाहीत. त्यांना त्रास देतात. म्हणून त्या घर सोडून निघून गेल्या.' विश्वास नांगरे पाटील यांनी प्रमिला पवार, त्यांचा मुलगा सतीश आणि सून सीमा यांना पोलीस आयुक्तालयात समक्ष बोलावले आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर मुलाने आणि सुनेने आईला घेऊन यापुढे एकत्र राहू असं सांगितलं. यानंतर भावपूर्ण वातावरणात त्यांनी पोलीस आयुक्तालयातून निरोप घेतला.