Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. कामानिमित्त शहराच्या वाटेवर असणारी ही मंडळी या दिवसांमध्ये सहकुटुंब गावची वाट धरतात. मोठा मुक्काम झाल्यानंतर मग खरी तारेवरची कसरत सुरु होते ती म्हणजे पुढच्या किंवा परतीच्या प्रवासासाठी तिकीट मिळवण्याची.
सध्याही कोकणात असंच चित्र असून, येथे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अनेकांना निर्धारित वेळापत्रकांमध्ये देण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्येही आरक्षण मिळत नाहीय. अशा परिस्थितीत कोकणवासियांसाठी Konkan Railway मदतीला धावली असून, पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी या मार्गावर विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांच्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी आणि गर्दी विभाजित करण्यासाठी या रेल्वे प्रवाशांच्या सेवेत हजर असतील. 6 जूनपर्यंत कोकण रेल्वेच्या या विशेष गाड्या निर्धारित मार्गांवर धावतील.
आयत्या वेळी कोकणमार्गावर प्रवास करायचा असल्यास गाडी क्रमांक 01158 तुमच्या सेवेत असून, मडगाव ते पनवेल विशेष रेल्वे 6 मे रोजी सकाळी निर्धारित स्थानकातून निघाली आहे. सोमवारीच ही गाडी पनवेलला सायंकाळी 6.50 वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 01157 8 मे रोजी पहाटे 4 वाजता पनवेलहून निघून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मडगावला पोहोचेल. 20 एलएचबी डबे असणाऱ्या या गाडीत 10 स्लीपर, 8 जनरल आणि 2 एलएलआर कोच असतील.
मडगाव ते पनवेल (दोन्ही मार्गांवर) कोणत्या स्थानकांवर थांबणार ही रेल्वे?
ही गाडी करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल या स्थानकांवर थांबेल.
गाडी क्रमांक 01159 पनवेल – सावंतवाडी रोड ही रेल्वे 6 मे रोजी रात्री 8 वाजचा पनवेलहून निघून दुसऱ्या दिवशी निर्धारित स्थानकात सकाळी 6 वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 01160 सावंतवाडी रोड ते पनवेल ही गाडी 7 मे रोजी दुपारी 4 वाजता पनवेल दिशेनं प्रवास सुरु करणार असून, दुसऱ्या दिवशी 3 वाजता पनवेलला पोहोचेल.
पनवेल - सावंतवाडी या मार्गावर (दोन्ही बाजूच्या प्रवासात) ही रेल्वे खालील स्थानकांवर थांबेल
रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर ही गाडी थांबेल.
कोकण रेल्वे मार्गावर मंगळवारी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष गाड्यांमुळे कोकणातील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला तरी प्रवासाचा कालावधी मात्र वाढणार आहे. शिवाय या ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.