प्रदीप कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

इंडियन एअरफोर्सचा (Indian Air Force) अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला होता आणि तो पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एटीएसने त्याला अटक केली आहे. प्रदीप कुरुलकरबरोबर संबंध होते का याचा तपासही एटीएस करत आहे.

सागर आव्हाड | Updated: May 15, 2023, 05:32 PM IST
प्रदीप कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर title=

पुणे : डिआरडिओचे (DRDO) संचालक प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांनी पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एटीएसने (ATS) अटक केली. त्यानंतर आता इंडियन एअरफोर्समधल्या (Indian Air Force) आणखी एका अधिकाऱ्याला एटीएसने अटक केली आहे. नितीन शेंडे असं या अधिकाऱ्याचं नाव असून तो पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. त्याचबरोबर नितीन शेंडे हा एअर फोर्स मध्ये असून त्याचा आणि प्रदीप कुरुलकरांचा काय संबंध आहे याचा तपासही एटीएस करत आहे.

ज्या आयपी अॅड्रेसवरुन प्रदीप कुरुलकरशी संपर्क साधला जात होता, त्याच आयपी अॅड्रसवरुन भारतीय वायूदलात बंगलोरमध्ये कार्यकरत असलेल्या नितीन शेंडे याच्याशी संपर्क साधला जात होता. तपासात ही गोष्ट समोर आल्यानंतर नितीन शेंडे याला एटीएसने ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे. नितीन शेंडे यांनी कोणती माहिती पाकिस्तानला दिली आहे का याचा तपास आता केला जात आहे. 

प्रदीप कुरुलकरकडे तपास
दरम्यान प्रदीप कुरुलकरच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रदीप कुरुलकर डीआरडीचा संचालक होता, डीआरडीओमध्ये अँड्रॉईड फोन वापरण्यास बंदी असतानाही कुरुलकर चार ते पाच अँड्रॉईड फोन वापरत होते. हे सर्व फोन जप्त करण्यात आले आहेत. यातला एक फोन अनलॉक होत नव्हता. त्यानंतर तो फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला. त्यांनाही तो फोन उघडता आला नाही. अखेर आज कुरुलकर याने स्वत: तो फोन अनलॉक करुन दिला. आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर एटीएसच्या गेस्टहाऊसमध्ये काही महिलांना भेटल्याचं फुटेज समोर आलं आहे. 

दरम्यान आज प्रदीप कुरुलकरला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एटीएसने त्याची एक दिवसाची कोठडी मागितली. प्रदीप कुरुलकराला ज्या महिलेने फोन केला होता त्याच महिलेने नितीन शेंडेला कॉल केला होता का याचा तपास एटीएसला करायचा आहे. प्रदीप कुरुलकरला कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अशी झाली अटक
DRDO च्या संचालकाने पदाचा गैरवापर करत प्रदीप कुरुलकरने त्याच्या अखत्यारित असलेली संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला (Pakistan Intelligence operative) पुरवल्याचा आरोप आहे. त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकिय गुपितं जी शत्रू राष्ट्राला मिळाल्यास भारतच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो अशी माहिती अनधिकृतरित्या शत्रू राष्ट्राला पुरवली. याबाबत दहशतवादी विरोधी पथकाने पाळत ठेवत त्याला अटक चार मे रोजी अटक करण्यात आली होती.