तीन महिन्यात ही नगरी मंदिराची की गुन्हेगारांची

तीन महिन्यात शहरात १३ खून तर २१ प्राणघातक हल्ले 

Updated: Mar 27, 2023, 05:27 PM IST
तीन महिन्यात ही नगरी मंदिराची की गुन्हेगारांची title=
सीसीटीव्हीत कैद झाली घटना

सोनू भिडे, नाशिक:-  मंदिरांची नगरी आता गुन्हेगारांची नगरी होऊ पहातेय. पुण्यात कोयता गँगचा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत दिसून येत आहे. शहरात भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याच्या घटना ताज्या असताना नाशिक शहरात दहावीचा पेपर देऊन घरी जात असताना मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. तर रविवारी सातपूर आणि अंबड भागात कोयता आणि तलवारीने दुकानदारावर हल्ला करण्यात आला आहे. या सततच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारी कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रविवारी शहरात दोन ठिकाणी हल्ले

सातपूर भागातील कार्बन नाका परिसरातील अभिषेक बेकरीमध्ये रविवारी सात ते आठ जण केक खरेदी करण्यासाठी आले होते. केक घेऊन यातील एक जण बाहेर पडला होता. दुकान मालकाने विचारणा केली असता आम्ही का पळून चाललो आहे का ? असे उत्तर दिले. यानंतर संशयित आणि दुकान मालक अनिकेत जाधव यांच्यात बाचाबाची झाली. केक खरेदी करण्यासाठी  आलेल्या युवकांना राग आल्याने त्यांनी दुकान मालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात जाधव किरकोळ जखमी झाले आहेत. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जाधव यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड औद्योगिक वसाहतील सिमेन्स कंपनीजवळ ज्ञानेश्वर वारुंगसे यांची पान टपरी आहे. रविवारी सायंकाळी  पाच वाजेच्या सुमारास रिक्षातून तीन ते चार जण पान टपरीवर सामान खरेदी करण्यासाठी आले होते. पान टपरीवर सामान खरेदी करून झाल्यावर पैसे देण्यास टाळाटाळ करून दमदाटी करू लागले होते. यानंतर संशयित आरोपींनी वारुंगसे आणि मध्यस्थी करणारे धनंजय दातीर यांना मारहाण केली असून तलवारीने हल्ला केल्याच म्हटलं जात आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या १० दिवसात आठ घटना

गेल्या दहा दिवसाचा गुन्हेगारीचा आढावा घेतला तर शहरात गोळीबार, खून, प्राणघातक हल्ले अशा आठ घटना घडल्या आहेत. यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खून झाले असून अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तर सातपूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींचा सुद्धा शोध लागू शकलेला नाही. शहरातील सातपूर अंबड आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यातील सातपूर मधील घटनेचे संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली असून त्यांची घटनेच्या ठिकाणी धिंड सुद्धा काढण्यात आली आहे.

शहरात कायद्याचे तीन तेरा

शहरात खून, प्राणघातक हल्ले, हाणामाऱ्या, चोऱ्या आणि घरफोडीच्या घटना रोजच्या झाल्या आहेत. नाशिक शहरात गेल्या अडीच महिन्यात शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत प्राणघातक हल्ल्याच्या २१ घटना घडलेल्या आहेत. तर गेल्या २५ दिवसांमध्ये तब्बल ११ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये कोयत्याने वार केल्याच्या घटना अधिक आहेत. या तीन महिन्यात शहरात १३ खून सुद्धा झाले आहेत. शहरात वाढती गुन्हेगारी बघता पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.