पुणे : कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल पुण्यात घडली होती. मात्र गुन्हा दाखल करायला तब्बल ३० तास लागले. चौफेर टीका झाल्यावर अखेर गुन्हा दाखल झाला.
पुण्यात वाहतूक नियमन करत असलेल्या वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मार खावा लागला. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकातील ही घटना आहे. सिग्नल तोडला म्हणून दुचाकीस्वाराविरोधात कारवाईस धजावलेल्या रवींद्र इंगळे यांच्यावर ही अवस्था आली. पोलीस दलाची यापेक्षा मोठी नाचक्की ती काय. पण विषय इथेच संपत नाही. मारहाण झालेले वाहतूक पोलीस रवींद्र इंगळे हे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यास डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गेले.
मात्र त्याठिकाणी तब्बल ५ तास बसल्यानंतरही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीची पत्नी पुण्यात न्यायधीश आहे. त्यामुळेच हा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली. झी २४ तासानं देखील यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. यापेक्षा जास्त नाचक्की नको म्हणून अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली.
पोलिसाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव श्याम भदाणे असं आहे. मारहाणीमध्ये त्यांची मुलगीदेखील सहभागी होती. या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यास इतका वेळ का लागला याचं समाधानकारक उत्तर मात्र पोलीस देऊ शकले नाहीत. .