जळगाव : जळगावमधल्या एका शाळेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेतल्या लिपिकाने शिक्षकांच्या नावावर परस्पर २२ लाखांचे कर्ज काढल्याचे लक्षात आले आहे. जळगावातल्या आनंदीबाई देशमुख शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या लिपिकाची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. अशोक मदाने असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याच्याकडून सखोल चौकशी करीत आहेत.
आनंदीबाई देशमुख शाळेत अशोक मदाने हा लिपिक पदावर काम करीत असून त्याने शाळेतील शिक्षकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने आठी शिक्षकांच्या नावे पतसंस्थेतून परस्पर २२ लाखांचं कर्ज काढले आहे. यासंबंधी शिक्षकांना कोणतीही कुणकुण नव्हती. पण जेव्हा त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांना संताप अनावर झाला. शिक्षिकांचे पगार, बिलं काढणे अशी कामे तो करीत होता.
त्याने आठ शिक्षकांच्या नावावर परस्पर त्यांना फसवत त्यांच्या स्वाक्ष-याही घेतल्या. तर काही जणांच्या बनावट स्वाक्ष-या केल्या. कर्जाचे हप्ते खात्यावरून कापले गेल्यांनतर शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला. या प्रकारानंतर लिपिक अशोक मदाने याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.