मोठी बातमी; इशारा मिळाला आणि नको असतानाही अखेर 'तो' आलाच

होलिका दहन झाल्यानंतर राज्यात तापमानाचा आकडा वर जात असतानाच हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरला

Updated: Mar 20, 2022, 11:14 AM IST
मोठी बातमी; इशारा मिळाला आणि नको असतानाही अखेर 'तो' आलाच title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : होलिका दहन झाल्यानंतर राज्यात तापमानाचा आकडा वर जात असतानाच हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरला. वर्तवलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर आणि सातारा-सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडायासह या भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसल्याची माहिती समोर आली. (Maharashtra Rain)

दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्याची नोंद करण्यात आली. तिथे कोकणात अवकाळीनं धुमाकूळ घातलेला असतानाच विदर्भात मात्र उष्णतेची लाट आणि मारा करण्याचा इशाराही हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. 

मुंबई आणि नवी मुंबई भागात अंशत: ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्याचं निरिक्षण करण्यात आलं.

वातावरणातील बदलांबाबत वर्तवण्यात आलेला हा अंदाज पाहता त्या धर्तीवर सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेतपीक आणि आरोग्य या दोन्ही घटकांवर या हवामातील बदलांचा थेट परिणाम पाहता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 
शनिवारी बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली. रविवारपर्यंत याचेच परिणाम हे पावसाच्या रुपात दिसण्याचा अंदाज हवामाना खात्यानं वर्तवला. 

भारतातील बहुतांशभागांमध्येही रविवारी पावसाच्या जोरदार, मध्यम ते तुरळक सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्य़ात आला आहे.  अंदमान - निकोबार बेटांपासून ते अगदी लडाखपर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये पावसाची नोंद करण्यात येईल. 

महाराष्ट्रात मात्र काही भागांत पाऊस आणि काही भागांत तीव्र उष्णचेची लाट दिसेल. थोडक्यात आज दिवसभरात कुठे बाहेर जाण्याआधी किंवा कोकणच्या दिशेनं जात असाल तरीही आधी हवामानाचा अंदाज घ्या आणि मगच पुढचा निर्णय.