ट्रेकिंग करणारा असाल तर सावधान...श्वसन त्रासाने जाऊ शकतो जीव,

नाशिकच्या युवा ट्रेकरचा स्फिती मध्ये मृत्यू

Updated: Aug 27, 2022, 08:08 PM IST
ट्रेकिंग करणारा असाल तर सावधान...श्वसन त्रासाने जाऊ शकतो  जीव,  title=
कौस्तुभ हुदलीकर

योगेश खरे, नाशिक:  

नाशिक मधील सह्याद्री शिखरांमधील छोटे मोठे डोंगर किल्ले चढण्याचा अनुभव काही औरच... श्रावणात अनेक देश विदेशातील पर्यटक नाशिक मध्ये ही चढाई करण्यासाठी येतात नाशिककरही यामध्ये पुढे असतात. नाशिकच्या जवळील पांडवलेणी ,रामशेज किल्ला, हरिहर किल्ला ब्रह्मगिरी ,अंजनेरी ही ट्रेकरशी आवडती ठिकाण....  मात्र ही छोटी मोठी ठिकाण सर केल्यानंतर हिमालय सर करण्याचं स्वप्न प्रत्येकाच्या उराशी असतं. आकाशाला गवसणी घालणारे पहाड त्यांना खुणावत असतात. मात्र समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचीवर असलेल्या या पहाडांमध्ये ट्रेकिंग करणं जीवाशी खेळ ठरू शकतो कारण तिथे असलेल्या ऑक्सिजनची कमी... अशाच हव्यासापोटी नाशिक शहरातल्या नुकतंच लग्न झालेल्या एका तरुणाला ऑक्सीजन कमी मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे

असा झाला मृत्यू
व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या कौस्तुभ हुदलीकर यांना डोंगर चढाई करण्याची आवड होती. ते नेहमी मित्रांसोबत गिर्यारोहण (Trekking) करण्यासाठी जात असत. कौस्तुभ आणि त्यांच्या मित्रांनी मिळून हिमाचल प्रदेश मध्ये पर्यटनासाठी जाण्याचा प्लान केला होता. त्यानुसार कौस्तुभ त्यांच्या मित्रांसोबत २१ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशात गेले होते. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर गुरुवारी कौस्तुभ हा मित्रांसोबत स्पिटी जिल्ह्यातील काझा डोंगरावर चढाई करण्यासाठी गेला होता. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास साधारण दोन हजार फूट उंचीवर गेल्यावर कौस्तुभला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तिथून खाली उतरत असतानाच कौस्तुभ कोसळला. त्याच्यासोबतच्या मित्रांनी व स्थानिक ट्रेकर्सनी त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. 

कौस्तुभच्या अचानक जाण्याने हुदलीकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, नऊ महिन्यांचा मुलगा, आई, वडील, बहीण असा परिवार आहे. 

हि घ्या काळजी
दुर्ग भ्रमंतीसाठी जाताना जागेची संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे. 
वातावरण आपल्या शरीरीला अनुकूल असणार आहे का याची खात्री करणे, 
गेल्यानंतर आवश्यक वस्तू उपलब्ध आहेत याची माहिती करून घेणे, 
शरीर साथ देणार नाही ते ठिकाण टाळावे, जास्त उंचीवर जाऊ नये
चढाई करताना वजनदार बॅग किंवा वस्तू सोबत ठेऊ नये 
चढाई करत असताना दम लागल्यास चढाई करू परत काही उतरून येणे योग्य असेल
कुठलीही चढाई करताना आपल्या वैद्यकीय क्षमता तपासून घेणे गरजेचे
चढाई करतेवेळी आपत्कालीन वैद्यकीय मदत सोबत असेल असा प्रयत्न करायला हवा