मुंबई : केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी आभारी आहे, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नव्याने राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशकं आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन करुन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाच्या जबाबदारीचा सहर्ष सविनय स्विकार, असे त्या म्हणाल्या.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशकं आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन करुन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाच्या जबाबदारीचा सहर्ष सविनय स्विकार.@narendramodi @AmitShah @JPNadda pic.twitter.com/zdCw0aDXJt
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 26, 2020
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून पंकजा मुंडे आणि तावडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेणार असल्याची चर्चा होती. नुकताच जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत या दोघांशिवाय राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांचाही समावेश करण्यात आला.
मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे खडसेंकडे पक्षानं पुन्हा दुर्लक्ष केलं का असा प्रश्न उपस्थित झालाय. खडसेंनी मात्र या नियुक्तांवर बोलण्यास नकार दिला आहे.
तर दुसरीकडे युवा मोर्चाची जबाबदारी खासदार पूनम महाजन यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी तेजस्वी सूर्या यांच्याकडं युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तेजस्वी सूर्या हे भाजपचे बंगळुरूचे खासदार आहेत.