राजू शेट्टी : शरद पवारांशी जवळीक आणि संघटनेतील मतभेद

राजू शेट्टी यांची ‘झी २४ तास’ला खास मुलाखत

Updated: Jun 18, 2020, 03:11 PM IST
राजू शेट्टी :  शरद पवारांशी जवळीक आणि संघटनेतील मतभेद title=

प्रताप नाईक, कोल्हापूर :   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून पाठवण्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव राजू शेट्टी यांनी स्वीकारला आहे. कधीकाळी शरद पवारांचे कट्टर विरोधक असलेले राजू शेट्टी आता पवारांच्या पाठिंब्याने विधान परिषदेत जाणार आहेत. पवारांशी ही जवळीक कधीपासून सुरु झाली? पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांचीच निवड का केली? शेट्टी यांच्या निवडीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजी आहे का? राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने आमदार झाल्यानंतर राजू शेट्टी यांच्या तत्वांचं काय होणार? सरकारबरोबर गेल्याने शेतकरी संघटनेचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काय भूमिका राहणार? २०२४मध्ये राजू शेट्टी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर राजू शेट्टी यांनी ‘झी २४ तास’शी बातचित केली. शेट्टी यांची ही सविस्तर मुलाखत.

शरद पवार आणि राजू शेट्टी

राजू शेट्टी आणि शरद पवार यांची जवळीक कशी निर्माण झाली याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, शरद पवारांची जवळीक लोकसभा निवडणुकीआधीपासून निर्माण झाली. मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे आम्ही केलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला. भूमी अधिग्रहन कायदा चांगला असताना केंद्राने दुरुस्तीचा प्रस्ताव आणला. त्यात सरकारने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्याला नख लावण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे दोन विधेयकाची निर्मिती केली. त्यावेळी माजी कृषिमंत्री म्हणून त्यांच्याशी चर्चा केली आणि भूमिका मांडली. या विधेयकाच्या निमित्ताने शरद पवार यांच्याशी जवळीक निर्माण झाली. या विधेयकाच्या निमित्ताने पवार यांच्याशी तासंतास चर्चा केली. शेतकऱ्यांना जातीच्या पातळीवर विभागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र यावेत म्हणून प्रयत्न झाला आणि एकत्र आलो.

विधान परिषदेच्या जागेबाबत

शरद पवार आमच्यावर दया करावी म्हणून विधानपरिषदेची जागा देत नाहीत. जो समझोता झाला होता त्यानुसारच ही जागा दिली जात आहे.

राजू शेट्टीच का?

सध्याचे राज्यपालांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत जी निकष आणि नियमाबाबत भूमिका घेतली आहे, त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेत माझ्याशिवाय कोणी नाही हे आघाडीकडून सांगण्यात आले. आघाडीच्या नेत्यांनी मीच ती जागा घ्यावी असा आग्रह केला. शेतकरी चळवळीतला नेता, स्तंभ लेखक, मी पुस्तक लिहिले आहे, दोन चित्रपटात काम केले आहे. म्हणून मी राज्यपाल नियुक्त आमदारकी घ्यावी असा आग्रह होता.

शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांना अधिक पाहिजे ते मी मागत राहणार. शरद पवार यांची सर्व मतं मला पटतात असं नाही. सर्व मतं पटली असती तर मी त्यांच्या पक्षात गेलो असतो. राज्य सरकारने घेतलेले सर्व निर्णय मला मान्य असतील असे नाही. हे यापूर्वीही घडले नाही आणि नंतरही घडणार नाही. सभागृहात जाणे हे आमचे उद्दीष्ट नाही. ते आमचं साध्य देखिल नाही. ते आमचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ आहे. समझोत्याचा भाग म्हणून विधानपरिषद सदस्यत्व मिळत आहे. याचा अर्थ सरकारचे सर्व निर्णय मान्य असतील असं नाही किंवा सर्व कृत्यांचं समर्थन केलं पाहिजे असंही नाही. २०२४ पर्यंत माझ्याकडे वेळ आहे. तोपर्यंत या सभागृहाचा प्रश्न मांडण्यासाठी उपयोग करणार. जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे ते मी करणारच. ते माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. त्यावर कुणी गदा आणू शकत नाही. मी कुठल्याही इझमच्या मागे जाणार नाही. शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे ते करत राहणार. मला कुणी संधीसाधू म्हणो किंवा आणखी काही. मला ज्या ज्या वेळी वाटेल शेतकऱ्यांना यांनी फसविले आहे, तेव्हा अद्दल घडविण्यासाठी जे करायला पाहिजे ते मी करणार. पूर्वीही केलं आणि आताही करणार. ज्यावेळी शेतकऱ्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल तेव्हा मी माझी वैयक्तीक कामे करेन.

२०२४ मध्ये काय?

मी दिल्लीत जाणार आहे. ताट मानेनं जाणार आहे. २०२४ ला. शेतकऱ्यांच्या वर्गणीतूनच जाणार आहे. जर जमलं नाही तर घरात बसणार आहे.

संघटनेत नाराजी आहे?

राजू शेट्टी यांनाच विधानपरिषदेची आमदारकी दिल्याने संघटनेत नाराजी आहे. याबाबत राजू शेट्टी म्हणाले, संघटना फुटावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. दोन दिवस थांबा. संघटनेचा टवकासुद्धा उडू देणार नाही.