'माझ्या मुलाची चूक झाली...' आरोपीच्या आई-वडिलांचा प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी टाहो

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यामागे सूत्रधार कोण? हल्ल्याचे राजकीय पडसाद... प्रज्ञा सातव यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Updated: Feb 9, 2023, 04:10 PM IST
'माझ्या मुलाची चूक झाली...' आरोपीच्या आई-वडिलांचा प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी टाहो

गजानन देशमुख, झी मीडिया हिंगोली :  काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर एक भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली. स्वत: प्रज्ञा सातव यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांच्यात मतदार संघातील कसबे धवंडा या गावात असतानाच हा हल्ला करण्यात आला. 'एका अज्ञात इसमानं पाठीमाहून येत हा हल्ला केला. मला इजा पोहोचवण्यासाठीचा हा एक गंभीर प्रयत्न होता. ज्यामुळं आता माझ्या जीवाला धोका आहे. एका महिला आमदारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला. समोर या, असे भ्याड हल्ले काय करता....' असं प्रज्ञा सातव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

हल्ल्याचे राजकीय पडसाद
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटले आहेत. महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली,तर अनेक पक्षाच्या लोकप्रतीनिधींनी सरकार टीका करीत या राज्यात लोकप्रतिनिधी ही सुरक्षित नसल्याचे म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी काल रात्रीच आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला अटक केली आहे. 

आरोपीच्या आई-वडिलांचा टाहो
दरम्यान, आपल्या मुलाची चूक झाल्याचं म्हणत आरोपीच्या पालकांनी प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी टाहो फोडला. आज आरोपी महेंद्र डोंगरदिवे याचे आई-वडिल आमदार प्रज्ञा सातव यांच्या कळमनुरी इथल्या कोहिनुर निवासस्थानी पोहोचले. आपल्या मुलाला माफ करा अशी विनवणी ते करतायत. माझ्या मुलाने दारूच्या नशेत हल्ला केला असून गावातली दारू बंद करा अशी मागणी त्याच्या आईने केली आहे. 

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी महेंद्र डोंगरदिवे याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हल्ला केल्यानंतर त्याने दारुच्या नशेत गावात गोंधळ घातला.

प्रज्ञा सातव यांच्या हल्ल्याचा निषेध
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला, त्यांना स्वत:च बचाव करता लागला, तिथेही सुरक्षा कमी पडली असा आरोप शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे. या हल्लामागील सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे, काही दिवसांपूर्वी एका नेत्याने जाहीर पणे सांगितले होते की प्रज्ञा सातव यांना घरी बसवणार. घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढवण्याची आवश्यकता आहे, याबाबत देखील मी गृह सचिवांशी बोलले असं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.